बातम्या
“शिक्षकांनी दीपस्तंभासारखं तत्वज्ञान अंगिकारुन ज्ञानदानाचे काम करावे ” - डॉ. श्रुती जोशी
By nisha patil - 7/20/2026 8:21:24 PM
Share This News:
“शिक्षकांनी दीपस्तंभासारखं तत्वज्ञान अंगिकारुन ज्ञानदानाचे काम करावे ” - डॉ. श्रुती जोशी
कोल्हापूर दि.20, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विवेकानंद कॉलेज कोल्हापूर (अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्यावतीने 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि व्यावसायिक नैतिकता' या विषयावर एकदिवसीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने आणि रोपाला पाणी घालून करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी केले.
उद्घाटनपर भाषणात प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे म्हणाले की, या कार्यक्रमामुळे नवनिर्वाचित प्राध्यापकांना उर्जा निर्माण होईल. तसेच त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरेल. हा कार्यक्रम तीन सत्रात संपन्न झाला. पहिल्या सत्रात प्र.प्राचार्या डॉ. श्रुती जोशी (कन्या महाविद्यालय) इचलकरंजी यांनी ‘शैक्षणिक संस्थांमधील नैतिक मूल्यांचे महत्त्व आणि शिक्षकांची जबाबदारी’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात संस्था उभारणीसाठी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी केलेला त्याग सर्वांसमोर मांडला. त्या पुढे म्हणाल्या बापूजींनी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून या संस्थेची उभारणी केली आहे. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्राध्यापकांनी आपले शैक्षणिक कार्य केले पाहिजे. शिक्षकांनी सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनात नैतिकता सांभाळल्या पाहिजेत. कारण राष्ट्र निर्माण करणारा माणूस घडविण्याचे काम शिक्षक करीत असतो. म्हणूनच शिक्षकांकडे मानवतेचे अधिष्ठान असले पाहिजे, याबरोबरच शिक्षकांनी स्वतःचे धार्मिक विचार आणि राजकीय विचार आपल्या कामाच्या ठिकाणी आणता कामा नये, असेही त्यांनी मार्गदर्शन केले.
दुस-या सत्रात ‘परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता’ या विषयावर विवेकानंद कॉलेजच्या परीक्षा विभागातील डॉ. जी.जे.नवाथे (परीक्षा नियंत्रक), डॉ.डी.आर.तुपे (उपपरीक्षा नियंत्रक), प्रा. एच. व्ही. चामे यांनी परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी घ्यावी लागणारी काळजी तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा विषयी द्यावयाच्या सूचना आणि मूल्यमापन करताना प्राध्यापकांच्या जबाबदाऱ्या या विषयी बहुमोल असे मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) चे समन्वयक डॉ. एस. आर. कट्टीमनी यांनी नवीन शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक क्षेत्रात झालेले बदल त्या बदलाला सामोरे जात असताना संशोधन, पेटंटस, कॉपी राईट, ऑनलाइन अध्यापन आणि कोर्सेस निर्मिती शिक्षण पद्धतीचा अवलंब केल्यास काळाच्या कसोटीवर स्वत:ला सिद्ध करता येईल.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. आर. कट्टीमनी यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार डॉ. कविता तिवडे यांनी मांनले आणि सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील नवनिर्वाचित प्राध्यापक उपस्थित होते
“शिक्षकांनी दीपस्तंभासारखं तत्वज्ञान अंगिकारुन ज्ञानदानाचे काम करावे ” - डॉ. श्रुती जोशी
|