बातम्या
पुण्यात शिक्षकांचे धरणे आंदोलन; संचमान्यतेचा फेरआढावा घेण्याची जोरदार मागणी
By nisha patil - 4/9/2026 11:13:19 PM
Share This News:
पुण्यात शिक्षकांचे धरणे आंदोलन; संचमान्यतेचा फेरआढावा घेण्याची जोरदार मागणी
पुणे दि. ४ : उच्च माध्यमिक स्तरावरील प्रस्तावित अन्यायकारक संचमान्यता धोरणाविरोधात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ यांच्या वतीने दिनांक 4 सप्टेंबर रोजी शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन व जोरदार निदर्शने करण्यात आली. शासनाच्या प्रस्तावित संचमान्यता मसुद्याचा यावेळी तीव्र निषेध करून प्रचलित निकषांनुसार संचमान्यता करण्याची मागणी करण्यात आली.
शिक्षकांच्या सेवासुरक्षेसोबतच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि संस्थांच्या प्रत्यक्ष गरजा विचारात घेऊन शासनाने प्रस्तावित संचमान्यता धोरणात तातडीने सुधारणा करावी, राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यतेसंदर्भात शिक्षण संचालनालयाने शासनाकडे सादर केलेला प्रस्तावित मसुदा अन्यायकारक असून त्याची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील सुमारे ८ ते १० हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक पूर्णवेळ शिक्षक अर्धवेळ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षकांची सेवासुरक्षा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणणारे संचमान्यतेचे निकष तातडीने रद्द करावेत, अशी जोरदार मागणी शिक्षक मित्र श्री. कौस्तुभ गावडे यांनी केली.
प्रस्तावित मसुद्यामध्ये ४५ मिनिटांची तासिका ४० मिनिटांची करण्याचा निकष सुचविण्यात आला आहे. त्यामुळे उपलब्ध तासिकांच्या गणनेत मोठा बदल होऊन शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विज्ञान शाखेतील एका बॅचची विद्यार्थीसंख्या २० वरून ३० करण्याचा प्रस्ताव असून, त्याचा थेट परिणाम विज्ञान शाखेतील शिक्षकांच्या पदांवर होणार असल्याचे श्री. कौस्तुभ गावडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी संघटनेचे श्री संजय शिंदे, श्री अविनाश बोर्डे, श्री लक्ष्मण रोडे, श्री रविंद्र भदाणे, रवींद्र पाटील, प्रा शिवराम सूर्यवंशी, प्रा डॉ अशोक गव्हाणकर, प्रा दिलीप शितोळे, प्रा मुकुंद आंधळकर, प्रा संतोष फाजगे यांनी मनोगते व्यक्त केली.
वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखांसाठी १२० विद्यार्थीसंख्येचा निकष प्रस्तावित करण्यात आला आहे. या निकषामुळे अनेक तुकड्या अनुदानासाठी अपात्र ठरण्याची शक्यता असून, कार्यरत शिक्षकांच्या सेवासुरक्षेचा प्रश्न गंभीर होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले.
उच्च माध्यमिक स्तरावरील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी आणि विलंबामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. प्रवेश प्रक्रियेला होणारा विलंब आणि विविध तांत्रिक अडचणी यामुळे काही विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळतात. परिणामी कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थीसंख्या कमी होऊन शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याचा मुद्दाही आंदोलनकर्त्यांनी मांडला.
या आंदोलनादरम्यान अन्यायकारक संचमान्यता तातडीने रद्द करावी, प्रस्तावित निकषांचा वस्तुनिष्ठ फेरआढावा घ्यावा, कार्यरत शिक्षकांवर कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच प्रचलित निकषांनुसार पारदर्शक ऑनलाईन संचमान्यता प्रक्रिया राबवावी, अशा मागण्या करण्यात आल्या. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनास विविध शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे सहसचिव श्री. दिलीप शितोळे, कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. आण्णासाहेब बागडी, सातारा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. सुनील शिंदे, सांगली जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. सुरेश भिसे, श्री. अभिजीत दुर्गी यांच्यासह महाराष्ट्रातून हजारो शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यात शिक्षकांचे धरणे आंदोलन; संचमान्यतेचा फेरआढावा घेण्याची जोरदार मागणी
|