ताज्या बातम्या

आजऱ्यात रमजान महिन्यामुळे अगदी रमजानमय वातावरण झाले

The month of Ramadan has created a very Ramadan like atmosphere in the city


By nisha patil - 2/21/2026 12:45:22 PM
Share This News:



आजऱ्यात रमजान महिन्यामुळे अगदी रमजानमय वातावरण झाले

आजरा (हसन तकीलदार) :- रमजान हा इस्लामिक दिनदर्शिकेतील 9वा आणि अत्यंत पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये दिवसभर अन्न पाणी सर्व काही त्यागून कडकडीत रोजे (उपवास)केले जातात. पहाटे (सहरी)ते सूर्यास्तानंतर (इफ्तार)पर्यंत अन्न पाण्याशिवाय राहून नमाज, कुरआन पठण आणि दान धर्माद्वारे अल्लाहची उपासना केली जाते. आजऱ्यात या महिन्यात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. 18फेब्रुवारी रोजी रात्री पहिली तराबीह सुरु झाली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून रोजे सुरु झाले. पवित्र महिन्याच्या आगमनाने वातावरण अगदी भक्तीमय आणि प्रफुल्लित झाले आहे.
      गल्लीतून विद्युत रोषणाई केली आहे. विद्युत रोषणाईमुळे रात्री अगदी उजळून निघाल्या आहेत. आमराई गल्लीतील विद्युत रोषणाई दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आकर्षणाचे केंद्र बिंदू बनले आहे तर नाईक गल्लीतील खवय्ये स्टॉल विशेष आकर्षित करीत आहेत. खवय्यासाठी विविध प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत. दुधाचा स्पेशल चहा, खांडोळी, आम्लेट, भजी,सिक्सटीफाय, फळे,अनेक प्रकारची खजूर, ड्रायफूड, समोसे, तंदूर, अत्तर, टोप्या, चिकन लॉलीपॉप, क्रिस्पी, बिर्याणी,सरबत, रुहअब्जा अशा अनेक पकवान्नांची स्टॉल खवय्याना आकर्षित करीत आहेत. नाईक गल्लीत तर लहान लहान मुलांनी आपली एक वेगळीच बाजारपेठ थाटली आहे. कुणी अर्धा खाऊचा पान घेऊन त्यात बडीशेप, गुलकंद घालून 1₹ला मसाला पान म्हणून विकत आहेत, कुणी पोहे पासून तयार केलेला अलिपाक रुपयला दोन लहान चमचे तर कुणी छोट्या छोट्या ग्लासमधून आठआणे रुपयला सरबत, फिरनी देत आहेत. लहान मुलांचा गोंगाट आणि हाका मारून विकण्याची कला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. त्याचप्रमाणे नाईक गल्लीतील इतर दुकानांची रेलचेल वातावरण निर्मिती करीत आहे. तेथील खाद्यपदार्थ पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. सायंकाळी रोजा इफ्तारिनंतर या स्टॉलवर गर्दी पहावयास मिळत आहे.
      रोजा केवळ उपाशी राहणे नसून मनावर आणि इंद्रियावर संयम ठेवणे, खोटे न बोलणे, वाईट सवयी सोडणे आहे. या महिन्यात पाच वेळच्या नमाजव्यतिरिक्त रात्री तराविह म्हणून विशेष सुन्नत नमाज पठण केली जाते. तराबिहमध्ये महिन्याच्या 27तारखेपर्यंत संपूर्ण कुरआन पठण करतात. या महिन्यात कुरआन पठणास खूप महत्व आहे. रमजान महिन्यात गरजू लोकांना मदत करणे, अन्नदान करणे, जकात, सदका देणे विशेष पुण्यकारक मानले जाते. रमजान महिन्यातील शेवटच्या दहा दिवसातील एक रात्री "शब्द-ए-कद्र "असते. जी हजार महिन्यापेक्षा श्रेष्ठ मानली जाते. आणि या रात्री जागून अल्लाहची आराधना केली जाते. विश्वशांतीसाठी, सुखसमृद्धीसाठी, गुनाहमाफिसाठी प्रार्थना केली जाते. महिना अखेरीस चंद्र दर्शन झाल्यानंतर "ईद-उल-फित्र"(रमजान ईद) साजरी केली जाते. हा महिना शांती, शिस्त आणि बंधुभाव वाढवण्याचा संदेश देतो. आपल्या इंद्रियावर मात करण्यासही शिकवतो. या महिन्याचा पहिला दशक कृपेचा, दुसरा दशक क्षमेचा तिसरा आणि अंतिम दशक नरकापासून मुक्ततेचा मानला जातो. रमजानमध्ये मिळणारी नेकी (पुण्य)ही इतर महिन्यात मिळणाऱ्या नेकी (पुण्याई)पेक्षा 70पटीने जास्त असते त्यामुळे मुस्लिम बांधव या महिन्यात जास्तीत जास्त नेकी कमावण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात संसार, व्यापार आदींचा त्याग करून अल्लाहला शरण जातात.


आजऱ्यात रमजान महिन्यामुळे अगदी रमजानमय वातावरण झाले
Total Views: 431