बातम्या
आजऱ्यात वणव्यांचे प्रमाण वाढले, उपाययोजना व जनजागृतीची गरज
By nisha patil - 4/3/2026 5:47:09 PM
Share This News:
आजऱ्यात वणव्यांचे प्रमाण वाढले, उपाययोजना व जनजागृतीची गरज
आजरा(हसन तकीलदार) :- आजरा तालुक्यात दिवसेंदिवस वणव्यांचे प्रमाण वाढत आहेत. या अगोदर गवसे, देवर्डे इ. भागात काजूबागा आणि गवत पेटून शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. आज दि. 4/3/2026 रोजी दुपारी आजरा -आंबोली रोडवरील नारायण बागेतही अचानक आग लागली त्यामुळे तेथे संवर्धीत केलेल्या वनऔषधी वनस्पती जळल्याचे समजते.
दुपारच्या सुमारास नारायण बागेत आग लागल्याचे पारेवाडीकरांना समजताच पारेवाडीकर तातडीने तेथे दाखल झाले आणि आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले. त्यातूनच कोणीतरी अग्निशमन दलाला सपंर्क साधून अग्निशमन दलाला पाचरण केले. तरीसुद्धा आग आटोक्यात येत नव्हती. या आगीमध्ये नारायण बागेतील संवर्धीत केलेल्या दुर्मिळ वनऔषधी वनस्पती तसेच पारेवाडी गावालगतच्या आडनाव शेतातील गवत,झाडे जळून नुकसान झाले असल्याचे महेश माने यांनी सांगितले. याअगोदरही दोन वर्षांपूर्वी अशीच आग लागून नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे बागेत आग लागल्याबाबत संत्रे साहेबांशी संपर्क साधून माहिती दिली असल्याबद्दल त्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार उशिरापर्यंत ही बाग पेटतच होती.
मागील दोन तीन वर्षापासून आजऱ्यातील सरपंच परिषद,मुंबईने जंगल संवर्धन व वणवा मुक्ती बाबत लोकजागृतीचे चांगले आणि विधायक काम हाती घेतले होते. याच धर्तीवर इतर सामाजिक संस्थानी आणि सामाजिक वनिकरण विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे काहींचे मत आहे. आग विझवण्यासाठी भडगावकर फर्निचर मॉलचे चालक बासित भडगावकर, नामदेव निकम, आर्यन निर्मळे, विनायक रेडेकर, बाबुराव रेडेकर, संभाजी निकम, अजित निकम, शैलेश माने, रोहन निकम, समर्थ माने, रुपेश निर्मळे, मयूर निर्मळे, मुकुंद निर्मळे, हार्दिक निर्मळे, नैतिक निर्मळे, जोतिबा माने, गोपाळ निर्मळे, दशरथ निकम आदींनी भाग घेतल्याचे सांगण्यात आले.
आजऱ्यात वणव्यांचे प्रमाण वाढले, उपाययोजना व जनजागृतीची गरज
|