बातम्या

आनंदी आणि भक्तीमय वातावरणात साळगावची यात्रा संपन्न

The pilgrimage to Salgaon concluded in a joyful and devotional atmosphere


By nisha patil - 7/5/2026 11:45:58 AM
Share This News:



आनंदी आणि भक्तीमय वातावरणात साळगावची यात्रा संपन्न


आजरा(हसन तकीलदार) - आजरा तालुक्यातील साळगाव येथे श्रीमहालक्ष्मीदेवीची यात्रा पारंपारिक पध्दतीने व मोठ्या थाटामाटात यात्रा संपन्न झाली आहे. यात्रेला सुरवात होऊन मंगळवार (ता. ५) लक्ष्मी खेळवण्याचा कार्यक्रम झाला . यावेळी गुलालाची उधळण करण्यात आली होती. प्रचंड प्रमाणात गुलालाची उधळण करण्यात आली होती.गुलालामुळे एखाद्या कलाकाराने संपूर्ण रस्त्याना आपल्या कलाकारीने रंगवल्यासारखे वाटत होते.तर बुधवार (ता. ६) यात्रेचा मुख्य दिवस होता.यात्रेनिमित्त उत्साहाचे व चैतन्याचे वातावऱण होते .


आजरा व आजरा तालुका हा निश्चितच चित्रा, हिरण्यकेशी नदी व चित्री धरणाच्या पाण्याने सुजलाम - सुफलाम आहे. त्यातीलच हिरण्यकेशी नदीच्या एकदम काठावर वसलेलं सुंदर देखणं गाव म्हणजे साळगाव . या गावची तब्बल 17 वर्षानंतर लक्ष्मीची यात्रा सुरू होती . गेली सात आठ दिवस गाव परिसर पाहुणे-रावळे, मित्रमंडळी, खेळण्याची दुकाने यांनी गजबजून गेले आहे.गावच्या सुंदर नियोजनामुळे पोलीस प्रशासनाच्या मदतीने वाहतूक व्यवस्था अतिशय छान पार पाडण्यात आली आहे.'

 

तब्बल 17 वर्षानंतर ही यात्रा आल्याने रात्री उशिरापर्यंत पाहुण्यांची ये जा सुरू होती. यात्रेनिमित्त गाव परिसर विद्युत रोषणाईने झगमगत होते .या नदीकाठावरील विठ्ठल रूखमाई मंदिर परिसर, वडाची झाडे आणि त्यांना केलेली विद्युत रोषणाई यांचे हिरण्यकेशी नदीच्या पाण्यामध्ये पडलेले प्रतिबिंब खरोखरच पाहणाऱ्याला एक सुखद आनंद देत होते.


साळगावची 17 वर्षानंतर यात्रा होत आहे त्यामुळे यात्रेनिमित्त घरांची रंगरंगोटी करण्यात आली असून मंदिराची सजावटीसह मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेसाठी मुंबई, पुणे येथून मोठ्या प्रमाणात चाकरमनी गावी परतला आहे. यात्रे निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहे. त्याचबरोबर स्पर्धा व मनोरंजनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते . गावात 1मे पासून इरडे पडले होते गावात चाक बंदी करण्यात आली होती .देवीला बळ दिल्यानंतर वाहतूक सुरु झाली.यात्रा समितीच्यावतीने जय्यत तयारी केली होती वाहनाची पार्किंग व्यवस्थेबरोबर तात्पुरते पर्यायी रस्तेही करण्यात आले होते . यात्रा समितीने पार्किंग, वळण व पर्यायी रस्ते, तसेच आरोग्य व पाण्याची सोय अगदी नियोजनबद्ध केली होती . माहेरवाशीणी, पै- पाहुणे साळगाव गावात दाखल झाले आहेत. बऱ्याच वर्षांनी यात्रा होत असल्याने ग्रामस्थामधे उत्साह व आनंदासह  भक्तिमय वातावरण दिसत आहे. यात्रेनिमित्त मेवामिठाई, खेळण्याची दुकाने लागली आहेत. मनोरंजनाचे खेळ, पाळणेही बसवण्यात आलेली होती . गावात यात्रे निमित्त लगबग पहावयास मिळत होती.आनंद आणि भक्ती याचा दुहेरी सुरेख संगम दिसत आहे.साळगाव हे गाव अगदी हिरण्याकेशीच्या नदीकाठावर वसलेले आहे आणि याच काठावर अनेक स्टॉल उभारण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी या स्टॉलना केलेली रंगीबेरंगी विद्युत रोषणाईचे प्रतिबिंब पाण्यात पडल्यामुळे मनमोहक दृश्य निर्माण करीत आहेत.


आनंदी आणि भक्तीमय वातावरणात साळगावची यात्रा संपन्न
Total Views: 78