बातम्या

गणेशोत्सवात गोंधळ घातलात तर खैर नाही! १७२ आरोपी पोलिसांच्या रडारवर

There will be consequences if you create a ruckus during Ganeshotsav


By nisha patil - 5/9/2026 5:10:45 PM
Share This News:



गणेशोत्सवात गोंधळ घातलात तर खैर नाही! १७२ आरोपी पोलिसांच्या रडारवर

गणेशोत्सव २०२६ शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी कोल्हापूर पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार करवीर उपविभागातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मागील काही वर्षांत गणेशोत्सव काळात गुन्हे दाखल असलेल्या संशयितांची माहिती संकलित करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर करवीर पोलीस ठाण्यात तब्बल १७२ संशयितांची ओळखपरेड घेण्यात आली.

यामध्ये करवीर पोलीस ठाण्याचे ६०, शिरोली एमआयडीसीचे ५१, मुरगुडचे १८, कागलचे १३, गांधीनगरचे १२ आणि इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६ आरोपी उपस्थित होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांनी संशयितांची ओळख पडताळून त्यांना सक्त सूचना दिल्या. दोन समाजात तेढ निर्माण करणारे कृत्य, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवा पसरवणारे मेसेज टाळा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. 

गणेशोत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संवेदनशील ठिकाणी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी गणेशोत्सव शांततेत साजरा करून पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


गणेशोत्सवात गोंधळ घातलात तर खैर नाही! १७२ आरोपी पोलिसांच्या रडारवर
Total Views: 17