बातम्या

तालुकावासियांना टोल पासून मुक्ती पण टोलचीनाक्याची हद्दपारी मात्र राहिली*

Tol


By nisha patil - 5/16/2026 12:52:11 PM
Share This News:



**तालुकावासियांना टोल पासून मुक्ती पण टोलचीनाक्याची हद्दपारी मात्र राहिली*

**आजरा(हसन तकीलदार)*:-मागील दोन अडीच वर्षापासून संकेश्वर बांदा महामार्गावरील आजरा एमआयडीसी जवळ उभा करण्यात आलेल्या टोल नाक्याविरोधात आजरेकरांनी लढा दिला आहे.

आजरावासीय टोल भरणार नाहीत, टोल हद्दपार करा यासाठी टोलमुक्ती संघर्ष समितीने तीव्र लढा दिला.संघर्ष समितीच्या लढ्याला यश येऊन आजरा तालुक्यातील खाजगी वाहनधारकांना टोलमधून मुक्ती देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. शुक्रवारी आजरा तहसीलदार भवनात तहसीलदार समीर माने यांचे उपस्थितीत ही बैठक झाली. टोलमुक्ती संघर्ष समितीचे सदस्य आणि महामार्गचे अधिकारी यांच्या समवेत ही बैठक पार पडली.

      या बैठकीमध्ये आजरा तालुका टोलमुक्त करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. दोन अडीचवर्षे संघर्ष चाललेल्या टोलविषयी सकारात्मक चर्चा होत तालुक्यातील जनतेला टोलपासून मुक्ती मिळालेली असली तरी स्थानिक व्यावसायिक वाहनधारकांना मात्र टोलचा फटका बसणार आहे. साधारणपणे 1 जूनपासून टोलची प्रक्रिया सुरु होणार आहे. जी वाहने व्यावसायिक असतील त्यांना पास देण्यात येणार आहेत. पिवळी नंबरप्लेट म्हणजेच व्यवसायिक वाहनाना 50% सवलतीचा पास, कारखाना ऊस वाहनाना टोल मोफत, कोल्हापूर पासिंग स्थानिक वाहनाना टोल मुक्ती, इतर पासिंग स्थानिक वाहनधारकांनी गावातील गाडी असल्याचा सरपंच दाखला, आधारकार्ड, फास्टटॅग अथवा आरसी बुक झेरॉक्स दाखवावे लागणार. जी वाहने व्यावसायिक असतील त्यांना पास जरी दिला तरी त्यांना टोलचा फटका मात्र बसणार आहे. त्यामुळे व्यावसायिक वाहनधारकांत नाराजी दिसत आहे. चर्चेदरम्यान संपत देसाई म्हणाले की, महामार्गावरील कामे अजून प्रलंबित आहेत. ती कामे पूर्ण झाल्याशिवाय आम्ही टोल सुरु करु देणार नाही. यावर बांधकाम अधिकारी अनिल पाटील यांनी आठ पंधरा दिवसात कामे पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. पंधरा दिवसांनंतर झालेल्या कामाचा आढावा घेऊन नंतरच टोल सुरु करण्याची प्रक्रिया राबवली जाईल असे सांगण्यात आले. प्रभाकर कोरवी यांनी लेंडओहळचा प्रश्न, पाण्याचा निचरा, लेंडओहळवर नव्याने पूल बांधावा, होणाऱ्या वाहतूक कोंडीवर योजना आखाव्यात त्याचबरोबर मसोबा जवळ व दर्डेवाडी जवळ रस्त्यावर अपघाती खड्डे पडले आहेत ते मुजवावेत, सूतगिरणी पासून एमआयडीसी पर्यंत दोन्ही बाजूला पथदिवे बसवावेत अशी सूचना मांडली. तर प्रकाश मोरस्कर यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटर्स पूर्ण करावेत. घाटकरवाडी, धनगरमोळा येथे घरात पाणी घुसत आहे. त्यामुळे तेथील रहिवास्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्या गटारी पूर्ण करा तसेच रस्त्यासाठी जमिनी गेलेल्या काही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही त्यांची रक्कम त्वरित द्यावी. आंबोली मार्ग व व्यंकटराव हायस्कुलपासून मॉर्निंग स्टार हॉटेल पर्यंत शहरातील रस्त्यावर येणारे पाणी लेंडओहळमध्ये निचरा करावा अशी सूचना मांडण्यात आली. दोन्ही नामदारसाहेबांनी आजऱ्यापासून 20 किलोमीटर पुढे टोलनाका हलवणार असे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? अशी चर्चा स्थानिक नागरिक करताना दिसत आहेत.

 यावेळी प्राधिकरणाचे उपव्यवस्थापक प्रसन्न कत्ते, पथकर तंत्रज्ञ देवेन आपटे, शाखा अभियंता अनिल पाटील यांच्यासह मुकुंददादा देसाई, युवराज पोवार, कॉ. शांताराम पाटील, कॉ. काशिनाथ मोरे, परशुराम बामणे, राजू होलम, युवराज जाधव, कॉ. संजय घाटगे, गोविंद पाटील, रवींद्र भाटले, वाय. जी. इंजल आदींनी सहभाग नोंदवला.


तालुकावासियांना टोल पासून मुक्ती पण टोलचीनाक्याची हद्दपारी मात्र राहिली*
Total Views: 91