बातम्या
*वृक्षारोपण कार्यक्रम -निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ गुरु गुरुपौर्णिमेला निसर्ग प्रेमिंचा अनोखा उपक्रम
By nisha patil - 7/29/2026 7:58:51 PM
Share This News:
*वृक्षारोपण कार्यक्रम -निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ गुरु गुरुपौर्णिमेला निसर्ग प्रेमिंचा अनोखा उपक्रम
*आजरा(हसन तकीलदार):-28 जूलै हा जागतिक निसर्ग संवर्धन दिन आणि 29 जुलै गुरुपौर्णिमा या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून वन विभाग आजरा व ग्रामपंचायत देवर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने कक्ष क्रमांक 214 जंगल क्षेत्रामध्ये काजूच्या 400 फळझाडांच्या रोपांची लागण करण्यात आली.
देवर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. कल्पना चाळके, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजि.जी. एम. पाटील, आजरा परिक्षेत्र वन अधिकारी सचिन सावंत यांच्या हस्ते रोपांची लागण करण्यात आली.यावेळी धनगरमोळा बीटच्या वनपाल सौ. कविता सावंत,ग्रामपंचायत अधिकारी सुभाष येळणे यांनी या उपक्रमासाठीचे नियोजन केले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजि. जी.एम. पाटील म्हणाले, जागातिक निसर्ग संवर्धन दिन व गुरुपौर्णिमच्या दिवसी रिमझिम पाऊस धारांमध्ये होत असलेले वृक्षारोपणामुळे या भागातील निसर्गसंपदा नक्कीच वाढीस लागेल. मानवाच्या संपूर्ण जीवनप्रवासामध्ये सर्वात पहिला, सर्वात पुरातन आणि अदिम गुरु कोणता असेल तर तो म्हणजे हा अथांग पसरलेला निसर्ग होय.
गुरुमुळे ज्याप्रमाणे मानवी जीवनाला आकार मिळतो, अंधारातून मार्गक्रमण करण्याची आत्मभावना प्राप्त होते म्हणजेच निसर्गरूपी गुरुमुळे मानवासाठी अन्न, वस्त्र, निवारा,शुद्ध हवा,पाणी त्याचबरोबर शिक्षणही मिळते.
सुर्यामुळे जीवसृष्टीसाठी प्रकाश मिळतो. त्याची निरपेक्षवृत्ती व सातत्य त्यामधून दिसून येते.डोंगर-पर्वत कितीही वादळे आली तरी अचल उभे राहून संकटाना धैर्याने तोंड देण्याचे मानवाला शिकवण देतात.खळखळत वाहणारी नदी कितीही दगड-धोंडे अडथळा म्हणून जरी आले तरी स्वत:चा मार्ग शोधत सागराला जाऊन मिळते.
त्यामुळे सुर्यक्रमणामुळे सातत्य, डोंगर पर्वतांकडून धैर्य, नद्यांकडून ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करणे या अशा अनेक गोष्टी आपण निसर्गाकडून शिकतोय. म्हणूनच निसर्गासारख्या सर्वश्रेष्ठ गुरुबाबतची कृतज्ञतेची भावना वाढीस लागणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी संबोधित केले.
आजरा परिक्षेत्र वन अधिकारी सचिन सावंत म्हणाले की,घटत चाललेले जंगल क्षेत्र व त्यामुळे होत
असलेल्या जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडलेले आहे आणि त्यामुळे तापमानवाढ, अतिवृष्टी, दुष्काळ इत्यादी संकटाना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे पुथ्वीतलावरील वृक्षाच्छादन अधिक वाढविणेवर भर देण्याची गरज आहे. त्याचबरोबर वन्यप्राणी व मानव संघर्ष टाळून सहजीवनाचा वसा घेणेची गरज निर्माण झालेचे मत त्यांनी मांडले,
ग्रामपंचायत अधिकारी सुभाष येळणे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या उपक्रमासाठी वनरक्षक शशिकांत टेके, वनसेवक रमेश पाटील (गवसे), देवर्डे ग्रामपंचायतीचे सदस्य, हत्ती हकारा टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते.
*वृक्षारोपण कार्यक्रम -निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ गुरु गुरुपौर्णिमेला निसर्ग प्रेमिंचा अनोखा उपक्रम
|