बातम्या
टोपजवळील राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचा अपघात; अनेक तास वाहतूक कोंडी
By nisha patil - 7/20/2026 11:48:18 AM
Share This News:
टोपजवळील राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचा अपघात; अनेक तास वाहतूक कोंडी
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर टोप ग्रामपंचायतीसमोरील स्पीड ब्रेकरजवळ शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात मागच्या ट्रकच्या केबिनचे मोठे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र, घटनेनंतर समोरच्या ट्रकचा चालक गाडीसह पसार झाला.
पुण्याकडून बेंगळुरूच्या दिशेने जाणारा एक ट्रक टोप ग्रामपंचायतीसमोरील स्पीड ब्रेकरजवळ आला असता, चालकाने अचानक ब्रेक लावला. यामुळे मागून येणाऱ्या ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव ट्रक समोरील ट्रकला जाऊन धडकला. या भीषण धडकेत मागच्या ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला असून टायरही फुटले आहेत. सुदैवाने, या अपघातात ट्रक चालक बालंबाल बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघात घडताच समोरच्या ट्रकचा चालक कोणालाही काही समजण्यापूर्वीच घटनास्थळावरून पसार झाला.
अपघातामुळे कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रात्रीच्या वेळी हा अपघात होऊनही पोलिस यंत्रणेला याची माहिती मिळाली नाही. स्थानिक नागरिकांनी रविवारी सकाळी हायवे पोलिसांना फोन करून माहिती दिल्यानंतरच सकाळी १०.३० वाजता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी कायम होती.
कागल प्रतिनिधी अजित बोडके
टोपजवळील राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचा अपघात; अनेक तास वाहतूक कोंडी
|