राजकीय
महागाई विरोधात उबाठाचे आजऱ्यात बैलगाडी घेऊन निदर्शने
By nisha patil - 5/30/2026 11:35:25 AM
Share This News:
महागाई विरोधात उबाठाचे आजऱ्यात बैलगाडी घेऊन निदर्शने
आजरा(हसन तकीलदार) - देशात गेली १२ वर्षे मोदी सरकार सत्तेवर आहे. सत्तेवर येण्या अगोदर अनेक आश्वासने दिली होती. पण प्रत्यक्षात मात्र ती पूर्ण न करता दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. गेल्या १० दिवसात ४ वेळा पेट्रोल व डिझेलची वाढ या सरकारने केली आहे. घरगुती गॅस तसेच कमर्शियल गॅसच्या किंमतींमध्ये भरमसाठ वाढ होत आहे. तसेच खाद्यतेलाच्या किमती वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्य माणसांचे जगणे कठीण झालेले आहे आणि हे सर्व पाप केंद्र व राज्य सरकारचे आहे. या सरकारची धोरणे फसल्यामुळे हे संकट देशावर आलेले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यासाठी पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी कराव्यात,घरगुती व व्यापारी सिलेंडरच्या किंमती कमी कराव्यात. सध्या शेतीची कामे जोरात चालू आहेत, तरी शेतीच्या अवजारांसाठी पेट्रोल पंपावर आवश्यक डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा. शेतीसाठी लागणाऱ्या खते व बी-बियाणांच्या किंमती कमी कराव्यात.जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावेत. संजय गांधी व आवश्यक योजनांचे पैसे वेळेत मिळावेत अशा मागण्यासाठी छत्रपती संभाजी चौकात आज उबाठा तर्फे निदर्शने करण्यात आली.
यावेळी उबाठाचे जिल्हा संपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले की, देशामध्ये अत्यंत आणीबाणीची परिस्थिती आहे. दर चार पाच दिवसांनी डिझेल पेट्रोलची दोन ते पाच रुपयानी दरवाढ होत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. ऐन शेती मशागतीच्या दिवसात डिझेल द्यायचे बंद केलेत. मराठवाडा विदर्भात लोकांच्या रांगाच्या रांगा पंपावर लागलेत पंपावर एक लिटर पेट्रोल मिळणार, पाचशेहेचेच डिझेल मिळणार असे बोलले जातंय ही 12वर्षाची सरकारची कमाई आहे असे म्हटले तरी चालेल. देशात ही परिस्थिती असताना पंतप्रधान परदेशात जाऊन चॉकलेट देतो ही एक प्रकारे गरिबांच्या तोंडावर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. ज्याला समाजामध्ये काम नाही, ज्याला समाजामध्ये स्थान नाही असे लोक या देशाचे नेतृत्व करत आहेत. शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे. वन्यप्राण्यांच्यामुळे होणारे नुकसानाचे बाजारभावाप्रमाणे दर मिळाला पाहिजे. जर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा असेल तर आपल्याला ही लढाई केलीच पाहिजे.
कॉ. संजय तर्डेकर म्हणाले, 2013-14 मध्ये देशात काँग्रेसचे सरकार होते कच्च्या तेलाचे दर 110 डॉलर प्रती बॅरेल असतानासुद्धा काँग्रेसने 50 ते 60 रु लिटरने पेट्रोल डिझेल दिले. खताच्या किमती अत्यंत कमी होत्या. शेतकऱ्यांच्या सगळ्या मालाला सबसिडी होती आणि देशात रबणारा कष्टकरी सुखा समाधानात होता. परंतु 2014 ला देशात भाजप प्रणित सरकार अस्तित्वात आलं आणि कच्च्या तेलाचे दर कमी असतानासुद्धा 60रु.चे पेट्रोल 103 रु.ला गेलं. आणि कारण इराण अमेरिका युद्धाचं सांगत आहेत. हे चुकीचं आहे कारण भारतातील रिफायनरिमध्ये कच्चे तेल साठवले तर दोन वर्षे टिकेल इतकी क्षमता आहे. बांगलादेश, नेपाळला कमी किमतीत डिझेल पेट्रोल जात आहे.महागाई कमी करायची असेल आणि शेतीमालाला भाव पाहिजे असेल तर या सरकारला गाडल्याशिवाय पर्याय नाही.
कॉ. शांताराम पाटील म्हणाले की, महागाईच्या भडक्याला जर धक्का द्यायचा असेल तर रस्त्यावर उतरूनच लढा द्यावा लागेल. सरकारने जनतेचा अंत पाहू नये. वेळ पडली तर जनता रस्त्यावर उतरली तर ती मोकळी उतरणार नाही. शेवटी हातात दगडं घेऊनच उतरेल. शेतमालाला दर नाही मात्र खतांचे दर गगनाला भिडलेत. जंगलातील जनावरे गल्ली गावात आणून सोडायची तेवढी शिल्लक ठेवलेत.शेतकरी आणि कामगारांना संपवणारे सरकार आहे.
शिवसेना उबाठा तालुका प्रमुख युवराज पोवार म्हणाले की, देशात मोदी सरकार येऊन 12 वर्षे झाली महंगाई, कालाधन, 15 लाख, रोजगार यातील काहीच झालेलं नाही.एकही आश्वासन पूर्ती केलेली नाही. परंतु देशात जेवढे दरोडेखोर असतील,जेवढे उद्योगपती असतील त्यांनी कर्जे काढून विदेशात पळून गेलेत. त्यांना संरक्षण देण्याचे काम या सरकारने केले आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला यांना न्याय मिळालेला नाही. फक्त जाती धर्माचे राजकारण केलेले आहे. ईडी, सीबीआयच्या गाड्या नाहक त्रास देण्यासाठी येत असतील तर त्या फोडून नाही जाळून टाकल्या पाहिजेत. ज्या लाडक्या बहिणींच्या मतावर हे सरकार आले त्या लाडक्या बहिणींना फसवण्याचे काम हे सरकार करतंय. लाडकी बहीण योजना, अपंग वृद्ध पेन्शन मिळत नाही. कर्जमाफीचा पत्ता नाही.युद्धाचे नाव सांगून महागाई वाढवली जात आहे.
यावेळी संजय येसादे, समिरभाई चांद यांनीही आपले मनोगते व्यक्त केली. दिनेश कांबळे, सागर नाईक, विलास किल्लेदार, बिलाल लतीफ, सुनील डोंगरे, सुयश पाटील, महेश पाटील, अमित गुरव, हरिश्चंद्र व्हराकटे, संजयभाई सावंत, रोहन गिरी, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
महागाई विरोधात उबाठाचे आजऱ्यात बैलगाडी घेऊन निदर्शने
|