बातम्या

स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; वीजबिलांची स्वतंत्र चौकशी करा – डॉ. उल्हास त्रिरत्ने

Ullas triratne


By nisha patil - 7/14/2026 6:24:11 PM
Share This News:



# स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; वीजबिलांची स्वतंत्र चौकशी करा – डॉ. उल्हास त्रिरत्ने

**प्रतिनिधी :** बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत, ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, अशी मागणी केली आहे.

 

डॉ. त्रिरत्ने यांनी दावा केला की, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांची वीजबिले दुप्पट-तिप्पट येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांची आर्थिक लूट आणि फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

स्मार्ट मीटरचा मुद्दा सध्या नागपूर खंडपीठात प्रलंबित असताना राज्यात त्याची सक्तीने अंमलबजावणी का केली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच, ज्या ठिकाणी ग्राहकांच्या संमतीशिवाय किंवा संमतीने स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत, त्या ठिकाणी जुन्या डिजिटल मीटरसोबत स्मार्ट मीटर समांतर बसवून दोन्हींच्या नोंदींची तुलना करावी, अशी मागणी त्यांनी केली.

 

दोन्ही मीटर किमान पाच ते सहा महिने एकत्र सुरू ठेवून त्यांच्या रीडिंगची पडताळणी करण्यात यावी. केवळ १२ किंवा २४ तासांच्या चाचणीवर स्मार्ट मीटरची अचूकता सिद्ध होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

राज्यात स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारक नसताना त्याची सक्ती का केली जात आहे, याचे उत्तर सरकार आणि वीज वितरण कंपनीने द्यावे, अशी मागणी करत या संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करण्याची मागणी डॉ. त्रिरत्ने यांनी केली.


स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; वीजबिलांची स्वतंत्र चौकशी करा – डॉ. उल्हास त्रिरत्ने
Total Views: 79