बातम्या
मडीलगे ग्रामस्थाच्या वतीने आजरा वनविभागला बिबटया व अन्य वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तसाठी निवेदन
By nisha patil - 8/24/2026 3:27:34 PM
Share This News:
मडीलगे ग्रामस्थाच्या वतीने आजरा वनविभागला बिबटया व अन्य वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तसाठी निवेदन
*आठ दिवसात ठोस उपाय योजना न केल्यास तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा
*आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा तालुका तसेच मडिलगे परिसरात बिबट्या व अन्य वन्यप्राण्यांचा वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून बिबट्या व अन्य वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, या मागणीसाठी मडीलगे ग्रामस्थांच्या वतीने आजरा वनविभागाला निवेदन देण्यात आले.
मडीलगे परिसरात बिबट्याच्या वावर वारंवार निदर्शनास येत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. शेतीची कामे करताना तसेच रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना ग्रामस्थांना मोठी भीती वाटत आहे. महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी एकत्र येत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन बिबट्या व अन्य वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. आवश्यक त्या ठिकाणी कॅमेरे व पिंजरे बसवावेत, वनविभागाची गस्त वाढवावी तसेच रात्रीच्या वेळी विशेष पथकाद्वारे परिसराची पाहणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वन्यप्राण्यांच्यामुळे भविष्यात कोणतीही जीवितहानी किंवा दुर्दैवीघटना घडण्यापूर्वी वनविभागाने ठोस पावले उचलावीत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. केवळ पाहणी करून न थांबता प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. दरम्यान, “आमच्या जमिनी तुम्हीच कसा आणि आम्हाला आमचा खंड द्या!” असा प्रस्ताव मडीलगे ग्रामस्थांनी नाईलाजाने वनविभागासमोर मांडला. वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेती करणे आणि शेतात जाणेही धोकादायक होत असल्याने, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त होत नसेल तर आमच्या जमिनी वनविभागानेच ताब्यात घेऊन त्याबदल्यात आम्हाला वार्षिक खंड द्यावा, अशी परखड भूमिका ग्रामस्थांनी मांडली.
आठ दिवसांत बिबट्या व अन्य वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना न झाल्यास तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी वनविभागाला दिला. “ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वी वनविभागाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी. आठ दिवसांत ठोस कार्यवाही करून ग्रामस्थांना सुरक्षितता मिळवून द्यावी; अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्यात येईल,” असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी बिबट्याच्या तसेच वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे पीडित शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वनविभागाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली.
मडीलगे ग्रामस्थाच्या वतीने आजरा वनविभागला बिबटया व अन्य वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तसाठी निवेदन
|