बातम्या

 विवेकानंदच्या विद्यार्थ्यांचा ध्वनीप्रदूषणाविरोधात बिंदू चौकात एल्गार

Vivekananda students raise their voices


By nisha patil - 9/9/2026 12:53:52 AM
Share This News:



‘डॉल्बीचा नाद, जेनझी बरबाद’

 विवेकानंदच्या विद्यार्थ्यांचा ध्वनीप्रदूषणाविरोधात बिंदू चौकात एल्गार

कोल्हापूर दि. 8 : सण-उत्सवांच्या काळात वाढणारा कर्णकर्कश आवाज आणि डॉल्बीच्या अतितीव्र ध्वनीप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरच्या भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने बिंदू चौक येथे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानात जुना राजवाडा पोलीस ठाणे, कोल्हापूर यांचेही सहकार्य लाभले.

‘डॉल्बीमुक्त आणि लेसर लाइटमुक्त कोल्हापूर’ हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता. विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक आणि लक्षवेधी घोषवाक्ये असलेले पोस्टर्स हातात घेऊन बिंदू चौक परिसरात जनजागृती केली. नागरिकांचे लक्ष वेधून घेत ध्वनी व प्रकाश प्रदूषणाच्या दुष्परिणामांविषयी संदेश दिला. ‘आतातरी व्हा जागे, नका जाऊ डीजेच्या मागे’, डॉल्बीचा ठोका, आरोग्याला धोका ‘डॉल्बीचा दणदणाट नको, निरोगी कोल्हापूर हवे’, ‘अब कि बार, डीजे हद्दपार’, ‘डॉल्बीचा नाद, जेनझी बरबाद’ अशा विविध घोषणांमधून विद्यार्थ्यांनी नागरिकांना जागरूक केले.

आजच्या काळात ध्वनीप्रदूषण ही केवळ पर्यावरणाची समस्या न राहता आरोग्याशी निगडित गंभीर बाब बनली आहे. विशेषतः हृदयविकार, उच्च रक्तदाब, श्रवणविषयक समस्या तसेच ध्वनीसंवेदनशीलता असलेल्या व्यक्तींना अतितीव्र ध्वनीचा त्रास अधिक जाणवू शकतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींवरही अशा मोठ्या आवाजाचा विपरीत परिणाम होऊ शकतो. याचबरोबर उच्च तीव्रतेच्या लेसर प्रकाशामुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने त्याच्या अनियंत्रित वापराबाबतही विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.

विवेकानंद कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागाच्या पुढाकाराने मागील वर्षापासून डॉल्बी आणि लेसर लाइटच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. भौतिकशास्त्रातील ध्वनी, वारंवारिता, तीव्रता, ध्वनीतरंग तसेच प्रकाश आणि लेसर यांसारख्या संकल्पनांचा दैनंदिन जीवनाशी संबंध जोडून विद्यार्थ्यांनी नागरिकांपर्यंत वैज्ञानिक पद्धतीने हा संदेश पोहोचविला.

यावेळी विभागप्रमुख प्रा. संजय एस. लट्टे यांनी डॉल्बीच्या अतितीव्र आवाजामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “डॉल्बी किंवा ध्वनिवर्धक यंत्रणेचा अनियंत्रित आणि अतितीव्र आवाज हा केवळ त्रासदायक नसून मानवी आरोग्यासाठीही घातक ठरू शकतो. ध्वनीची तीव्रता वाढल्याने कानांवर अतिरिक्त ताण येतो आणि दीर्घकाळ अशा आवाजाच्या संपर्कात राहिल्यास श्रवणशक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच अतितीव्र आवाजामुळे मानसिक ताण, अस्वस्थता आणि झोपेच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उत्सव साजरे करताना इतरांच्या आरोग्याचा आणि शांततेचा विचार करून ध्वनीवर्धकांचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे.”

यावेळी डॉ. गणेश जे. नवाथे  यांनी ध्वनी आणि प्रकाश यांचा आरोग्याशी असलेला संबंध स्पष्ट केला. ते म्हणाले, “भौतिकशास्त्राच्या दृष्टीने ध्वनीची तीव्रता आणि मानवी शरीरावर होणारा त्याचा परिणाम यांचा जवळचा संबंध आहे. अतितीव्र ध्वनीतरंगांचा सतत संपर्क कानांच्या संवेदनशील भागांवर परिणाम करू शकतो. त्याचप्रमाणे लेसर प्रकाश हा अत्यंत दिशात्मक आणि उच्च ऊर्जा घनतेचा प्रकाश असल्यामुळे तो डोळ्यांसाठी विशेषतः धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे उत्सवांच्या वेळी लेसर लाइटचा वापर करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. विज्ञानाचा योग्य उपयोग हा मानवी जीवन अधिक सुरक्षित आणि निरोगी करण्यासाठी झाला पाहिजे.” विद्यार्थ्यांनी बिंदू चौक परिसरात पोस्टर्स, घोषवाक्ये आणि प्रभातफेरीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली. या उपक्रमातून ‘उत्सव आनंदाचा असावा, पण तो इतरांच्या आरोग्याच्या किंमतीवर नसावा’ असा सामाजिक संदेश देण्यात आला.

या जनजागृती अभियानात भौतिकशास्त्र विभागातील डॉ. नम्रता नरेवाडीकर, प्रा. अविनाश आर. गायकवाड, प्रा. मयूर अंकलगी, प्रा. अमेय पाटील, प्रा. अनुरथ गोरे, प्रा.प्रज्ञा पाटील, श्री. प्रशांत पाटील, श्री. पुंडलिक हरेर, श्री. गणेश माने, पोलीस कर्मचारी श्री अभिजीत परब, मनीषा काटकर प्रियंका जनवाडे, निलेश नाझरे, योगेश राक्षे, विकास किर्लेकर, प्रतीक शिंदे,  सावित्री पाटील, सविता पाटील, शितल कुंभार यांच्यासह भौतिकशास्त्र विभागातील अनेक विद्यार्थी सहभागी होते. या जनजागृती अभियानास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक बी. टी. दांगट आणि प्रबंधक सचिन धनवडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. ‘वैज्ञानिक दृष्टिकोनातून जनजागृती, सुरक्षित आणि निरोगी कोल्हापूरसाठी प्रत्येकाची जबाबदारी’ हा संदेश देत या जनजागृती अभियानाचा समारोप करण्यात आला.

 “‘डॉल्बीचा नाद, जेनझी बरबाद!’; ‘आवाज कमी कर डीजे, तुला आईची शपथ हाय!’; ‘अब की बार, डीजे हद्दपार!’  विद्यार्थ्यांच्या या भन्नाट आणि लक्षवेधी घोषणांनी बिंदू चौक परिसरात नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक ढंग, तरुणाईची भाषा आणि सामाजिक संदेश यांचा प्रभावी संगम साधत विद्यार्थ्यांनी ध्वनीप्रदूषणाविरोधातील जनजागृतीला वेगळाच रंग दिला. घोषणांचा आवाज घुमताच नागरिकांनीही कुतूहलाने विद्यार्थ्यांकडे पाहत या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


 विवेकानंदच्या विद्यार्थ्यांचा ध्वनीप्रदूषणाविरोधात बिंदू चौकात एल्गार
Total Views: 21