बातम्या

१६ मार्चला महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांसाठी मतदान; निवडणूक आयोगाचा कार्यक्रम जाहीर

Voting for 7 Rajya Sabha seats in Maharashtra on March 16


By Administrator - 2/18/2026 5:23:12 PM
Share This News:



१६ मार्चला महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांसाठी मतदान; निवडणूक आयोगाचा कार्यक्रम जाहीर
 

नवी दिल्ली, १८ फेब्रुवारी: भारतीय निवडणूक आयोग यांनी राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील या जागांसाठी मतदान प्रक्रिया १६ मार्च २०२६ रोजी पार पडणार आहे. महाराष्ट्रासह ओडिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील रिक्त होणाऱ्या जागांसाठीही निवडणूक होणार आहे.
 

महाराष्ट्रातील विद्यमान सदस्य डॉ. भागवत किशनराव कराड, डॉ. फौजिया तहसीन अहमद खान, प्रियंका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२६ रोजी संपुष्टात येत आहे.
 

निवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली जाणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ मार्च २०२६ आहे. अर्जांची छाननी ६ मार्च रोजी होईल, तर ९ मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. मतदान १६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत होणार असून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.
 

मतदान प्रक्रियेदरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या विशेष जांभळ्या स्केच पेनचाच वापर करणे बंधनकारक राहील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २० मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.


१६ मार्चला महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांसाठी मतदान; निवडणूक आयोगाचा कार्यक्रम जाहीर
Total Views: 13