बातम्या

जागतिक पर्यावरण दिन वृक्षलागवडीने साजरा

VrukshlagvD


By nisha patil - 6/6/2026 6:41:48 PM
Share This News:



**जागतिक पर्यावरण दिन वृक्षलागवडीने साजरा* 

  **आजरा(हसन तकीलदार)**:-उपविभागिय कृषी अधिकारी किरण पाटील, आजराचे तहसिलदार समिर माने, आजरा वन परिक्षेत्राचे अधिकारी सचिन सावंत यांच्या हस्ते जांभूळ प्रजातिच्या देशी झाडाचे रोपण करून आजऱ्यात सरपंच परिषद मुंबई यांनी पर्यावरण दिन साजरा केला.

   यावेळी सहा. गट विकास अधिकारी दिनेश शेटे , तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील यांच्या उपस्थिती मध्ये सरपंच परिषद आजराच्या पुढाकाराने हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

     'जंगले ही पृथ्वीची फुप्फुसे आहेत' जंगलाना लागणारी आग व वृक्षतोड यामुळे ती कमकुवत होऊन प‌र्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे त्यामुळे तापमानवाढी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वृक्षलागवडीचे कार्य सरपंच परिषदेच्या माध्यमातून गेले तीन चार वर्षे जोमाने सुरु आहे.

      गेल्या वर्षी सर‌पंच परिषदेने दहा हजार देशी प्रजातीची झाडे लावण्याचा संकल्प केला व तो यशस्वी करून दाखवत सर्वांच्या सहभागाने सात-आठ हजार झाडांचे जतनही केले आहे. त्यामुळे तालुक्यातील इतर निसर्गप्रेमी संघटना,संस्थानाही साद घालून वृक्षलागवडीची ही चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठीची जबाबदारी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रने घेतल्याचे सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले.

      आजरा तालुका व्यापारी असोसिएशन, आजरा तालुका पोलिस पाटील संघटना,आर्किटेक्ट व इंजिनिअर असोसिएशन आजरा, आजरा तालुका पत्रकार संघ, ग्रामसेवक संघटना,प्रजापिता ब्रम्हाकुमारी आजरा, संत निरंकारी मंडळ, आजरा यांचे प्रतिनिधी यांच्या हस्तेही वृक्षलागवड करणेत आली. व त्यांच्या सह‌भागा बद्ल प्रदेश सरचिटणीस राजू पोतनीस यांनी आभार व्यक्त केले.

     सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष पांडूरंग तोरगले (सरपंच मासेवाडी) व महिला तालुकाध्यक्षा सौ. वनश्री देसाई ( सरपंच पेरणोली) यांनी पुष्प देऊन उपस्थितांचे स्वागत केले.

     सरपंच परिषदेची सर्व मंडळी पर्यावरणाबाबत सजग असलेने अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम त्यांच्याकडून होताहेत ही शाश्वततेकडे घेऊन जाणारी कृती आहे. याचे अनुकरण करण्या बाबतचे अवाहनही गडहिंग्लजचे उपविभागिय कृषी अधिकारी किरण पाटील यांनी उपस्थिताना केले.

     आपल्या मनोगतामध्ये आजराचे तहसिलदार समिर माने म्हणाले की,आजरा तालुक्यातील सरपंच परिषदेची मंडळी विविध उपक्रमांच्या माध्य-मातून ग्रामविकासामध्ये भर घालत असतात. वणवा निर्मुलन मोहिम, वृक्षलागवड, शाळा परिसराची सुरक्षा अशा अनेक उपक्रमांमध्ये त्यांचे भरीव काम झालेले दिसते. याबाबत समाधान व्यक्त करतो.महसूल विभागाच्या योजनाही ग्राम स्तरावर राबविण्यासाठी सरपंच महोदयांनी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी आपल्या मनोगतामध्ये मत व्यक्त केले.

      मानव व वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी जंगले समृद्ध व्हावी लागतील. वृक्षलागवड हा त्यावरील उपाय असून त्यासाठी सरपंच परिषदेने हाती घेतलेले कार्य खूप उपयोगी ठरेल त्याचबरोबर प्लॅस्टिक मुक्त जंगल क्षेत्र व्हावे यासाठी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी प्लॅस्टीकचा वापर टाळावा असे अवाहनही आजरा वन परिक्षेत्राचे अधिकारी सचीन सावंत यांनी केले.

  प्रजापिता ब्रम्हाकुमारी आजरा सेंटरच्या मनिषा बहनजी म्हणाल्या निसर्ग हे शांततेचे आणि समुद्‌धीचे प्रतिक आहे. त्याच्या बळकटीसाठीचा आपला हा उपक्रम खूप कौतुकास्पद व समाजोपयोगी आहे. सर्वांनी त्याचे अनुकरण करूया.

  या उपक्रमासाठी तालुका व्यापारी असोसिएशचे उपाध्यक्ष वाय.जी. इंजल, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील,पोलिस पाटील संघटनेचे युवराज देसाई, गीता पाटील, नगरसेवक अनिकेत चराटी,पर्यावरण निरिक्षक दत्तराज पाटील,माजी उपसभापती निवृत्ती कांबळे, संत निरंकारी मंडळ आजराचे भिकाजी पाटील, तालुका पत्रकार संघ आजराचे रणजित कालेकर(पत्रकार), हसन तकिलदार(पत्रकार),अनिल पाटील सरपंच मुरुडे,धनाजी दळवी सरपंच चाफवडे,संजय सावंत उपसरपंच देऊळवाडी,

अरविंद गावडे उपसरपंच साळगाव, मारुती बुरुड उपसरपंच देवर्डे, रुपाली कांबळे पोलिस पाटील देवर्डे, त्याचबरोबर विविध गावचे सरपंच, उपसरपंच,पोलिस पाटील, कृषी विभागाचे अधिकारी, वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.सदरच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपसरपंच सुनिल बागवे यांनी केले. कृषी विभागाचे उपकृषी अधिकारी पी. जी. पाटील यांनी आभार मानले,


जागतिक पर्यावरण दिन वृक्षलागवडीने साजरा
Total Views: 11