बातम्या

म्हशीला वाचवायला गेला, आणि स्वतःचा जीव गेला... निकमवाडीवर शोककळा

Went to save a buffalo and lost his own life


By nisha patil - 1/8/2026 7:31:23 PM
Share This News:



म्हशीला वाचवायला गेला, आणि स्वतःचा जीव गेला... निकमवाडीवर शोककळा

पाऊस कोसळत होता. वारा सुसाट सुटला होता. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास निकमवाडी गावात सगळे आपापल्या घरात बसले होते. पण एका पत्र्याच्या शेडमधून आलेल्या जनावरांच्या कळवळणाऱ्या हंबरड्यांनी एका बापाचे पाय थांबू दिले नाहीत.
 

गावातील ग्रामपंचायत चौकात राहणारे दिलीप दौलू खोत, वय 40. त्यांच्या गोठ्यात त्या रात्री तीन गायी आणि एक म्हैस बांधलेल्या होत्या. मुसळधार पाऊस आणि वादळामुळे विद्युत तारेतून स्पार्क होऊन संपूर्ण गोठ्यात वीज उतरली होती. जनावरे घाबरून एकमेकांना आदळत होती, दोऱ्या तुटता तुटेना.
तो आवाज ऐकताच दिलीप धावत सुटले. त्यांना आधी जनावर दिसली. आपला जीव वाचेल की नाही याचा विचार करण्यापेक्षा "आधी यांना वाचवू" हेच त्यांच्या मनात होतं. धाडस करून ते गोठ्यात शिरले. एक करून गळ्यातल्या दोऱ्या सोडल्या. तिन्ही गायी आणि म्हैस बाहेर पडल्या. शेपूट हलवत त्या वाचल्या.
पण दिलीप स्वतः बाहेर येईपर्यंत खूप उशीर झाला होता.

ओल्या जमिनीवरून आलेला विजेचा झटका त्यांना बसला आणि ते जागीच कोसळले. ग्रामस्थ धावत आले. एका तरुणाने त्यांना उचलून सीपीआर रुग्णालयापर्यंत नेलं. डॉक्टरांनी तपासून फक्त एकच वाक्य सांगितलं, "ते आता नाहीत."एका क्षणात घरातलं छत कोसळावं तशी अवस्था झाली. बायको, मुलं, आई... सांगत होत्या की पुढे जाऊ नका तरीही केला व घराचा आधार गेला गावातल्या लोकांच्या डोळ्यात पाणी होतं. कारण दिलीप गेले ते फक्त जनावरांसाठी नाही, तर माणुसकीसाठी."आपल्या प्राण्यांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव देणारा माणूस" अशी ओळख आता निकमवाडी त्यांची करून देणार आहे.
       

सीपीआर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. तपास सुरू आहे. पण तपास काय करणार? जो गेला तो परत येणार नाही.
    आज पन्हाळा तालुक्यात प्रत्येकाच्या तोंडावर एकच वाक्य आहे. "दिलीप सारखं धैर्य आणि माया फार कमी लोकांमध्ये असते." पन्हाळा तालुका व संपूर्ण बांधारीत हळहळ व्यक्त होत आहे.


म्हशीला वाचवायला गेला, आणि स्वतःचा जीव गेला... निकमवाडीवर शोककळा
Total Views: 13