बातम्या
नंदवाळच्या ५० एकर जागेचा तिढा सुटणार?; मंत्रालयातील बैठकीत मोठी हालचाल
By nisha patil - 8/19/2026 6:13:23 PM
Share This News:
नंदवाळच्या ५० एकर जागेचा तिढा सुटणार?; मंत्रालयातील बैठकीत मोठी हालचाल
नंदवाळ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जागेचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. गावालगतची तब्बल ५० एकर जागा तीर्थक्षेत्र विकासासाठी उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना शासनस्तरावर वेग आला आहे. करवीर तालुक्यातील श्रीक्षेत्र नंदवाळ येथील रिंगण सोहळ्यासह भाविकांच्या विविध सुविधांसाठी जागेची मोठी अडचण निर्माण झाली होती. गायरान गट क्रमांक ६३ मधील सुमारे ४६ हेक्टर जमीन भारत राखीव बटालियन आणि राज्य राखीव पोलीस दलासाठी राखीव करण्यात आली होती. या निर्णयाला ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत आंदोलनेही केली होती.
दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २०२३ मध्ये झालेल्या बैठकीत गावासाठी सुमारे ५० एकर जागा राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही हा प्रश्न प्रलंबितच राहिला. याच प्रश्नासाठी आमदार चंद्रदीप नरके यांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. विधानसभेत लक्षवेधी मांडण्यापासून मंत्रालयातील बैठका आणि संबंधित विभागांशी समन्वय साधण्यापर्यंत त्यांनी हा मुद्दा लावून धरला.
आता राज्यमंत्री गृह योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत गट क्रमांक ६३ मधील गावालगतची सपाट जागा तीर्थक्षेत्र विकास आणि ग्रामस्थांच्या वापरासाठी राखीव ठेवण्याबाबत सकारात्मक निर्देश देण्यात आले आहेत. तसंच वनसदृश्य जमिनीबाबत आवश्यक NOC घेऊन पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नंदवाळ तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सविस्तर DPR तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी, मोजणी करून आवश्यक अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. जागेचा प्रश्न सुटल्यास नंदवाळमध्ये भक्तनिवास, पार्किंग, व्यापारी संकुल, बाग-बगीचा आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ जमिनीचा नसून लाखो वारकरी भाविकांची श्रद्धा, रिंगण सोहळ्याची परंपरा आणि नंदवाळच्या भविष्यातील विकासाशी जोडलेला आहे. शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नंदवाळ तीर्थक्षेत्र विकासाला आता नवी दिशा मिळण्याची चिन्हं आहेत.
नंदवाळच्या ५० एकर जागेचा तिढा सुटणार?; मंत्रालयातील बैठकीत मोठी हालचाल
|