बातम्या

निसर्ग प्रेमिंच्या लढ्याला यश येणार काय?

Will the fight of nature lovers succeed


By Administrator - 2/26/2026 11:36:57 AM
Share This News:



निसर्ग प्रेमिंच्या लढ्याला यश येणार काय?

आजरा (हसन तकीलदार ) :- आज विकासाच्या नावावर निसर्गाची खुलेआम कत्तल केली जात आहे. संकेश्वर बांदा महामार्ग बनवताना हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. पर्यायी झाडे आजही शोधून सापडत नाहीत. शेकडो वर्षांपूर्वीच्या आंबा, फणस, शिसम, किंजळ, ऐन, सावर, पिंपळ, वड यासारख्या झाडांना नामशेष होताना निसर्ग प्रेमिना फक्त बघत बसावे लागले.निसर्गसंपन्न आजरा तालुक्याची ओळख ‘कोकणाचे प्रवेशद्वार’ अशी आहे. आता मात्र रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ही ओळखच नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. हलकर्णी–वाटंगी–चितळे धनगरवाडा या रस्ता रुंदीकरणाच्या कामात वाटंगी फाटा ते महागाव दरम्यान असलेले १३ पुरातन वटवृक्ष सध्या मरणाच्या दारात उभे आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून ‘वृक्षप्रेमी समूह, आजरा’ हे  वृक्ष वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून, पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या सह्याद्री देवराई सारख्या संस्थांकडून मार्गदर्शन घेत आहेत. आता हा लढा निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे.
या संदर्भात वृक्षप्रेमी समूहाने झाडे तोडणारे सब-कॉन्ट्रॅक्टर, वनविभाग आणि तहसीलदार यांच्याशी सातत्याने चर्चा करून हे वृक्ष वाचवण्याचे साकडे घातले आहे. २४ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई यांनी या प्रकरणात पुढाकार घेत प्रत्यक्ष घटनास्थळी वृक्षप्रेमी, वनक्षेत्रपाल , ठेकेदार आणि एम एस आय डी सी च्या अभियंत्यांसोबत चर्चा केली.
मात्र, यावेळी एक धक्कादायक बाब समोर आली—कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणारे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक चर्चेसाठी उपलब्ध होत नाहीत. जबाबदार अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे स्थानिक प्रशासनाला इच्छा असूनही या झाडांना वाचवण्यासाठी मर्यादा येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
विशेष म्हणजे, वाटंगी फाटा ते महागाव रस्त्यावरील या १३ वडांच्या झाडांपैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता कोणतेही झाड वाहनचालकांच्या दृष्टीस अडथळा ठरत नाही. याच मार्गावर होनेवाडी येथील वनविभागाची झाडे रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत नसतील, तर मग हीच मोजकी झाडे अचानक ‘धोकादायक’ कशी ठरतात? असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
हा निसर्गाचा अमूल्य ठेवा पुढील पिढीसाठी टिकवून ठेवण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करणे अत्यावश्यक आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले, तरच हे वटवृक्ष वाचू शकतील; अन्यथा आजऱ्याचा निसर्गवैभवाचा वारसा केवळ कागदावरच उरेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
खरेतर बारामती–सोलापूर–पंढरपूर वारी मार्गावर गर्द वनराई उभी राहत असताना, मूळचा निसर्गसंपन्न कोकण भागाची चाहूल देणारा आजरा भाग हळूहळू ओसाड पडावा, यासारखे दुर्दैव नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष देणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. त्याचप्रमाणे निसर्गप्रेमीना समाजातून पाठिंबा मिळणे गरजेचे असल्याचे स्पष्ट होत आहे.


निसर्ग प्रेमिंच्या लढ्याला यश येणार काय?
Total Views: 371