बातम्या
आजरेकरांच्या समस्यांचे समाधान करण्यात नूतन नगरसेवक यशस्वी होतील काय?
By Administrator - 2/14/2026 5:37:29 PM
Share This News:
आजरेकरांच्या समस्यांचे समाधान करण्यात नूतन नगरसेवक यशस्वी होतील काय?
आजरा(हसन तकीलदार ):-आजऱ्याचा विकास म्हणजे निधी देऊन जनतेला समस्यामध्ये ढकलण्याचे काम ठरत आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेचा तर पुरता बोजावरा उडाला आहे. तर रस्ते, गटारिंच्या कामात कोणतेही नियोजन दिसून येत नाही. प्रत्येक वेळीच्या खोदाखोदीमुळे पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. आणि धूळ चिखलामुळे आजरेकर वैतागले आहेत.एकंदरीत आजरेकरांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पहिल्याच मासिक सभेत नूतन नगरसेवकांनी सर्व समस्यांची मांडणी करीत त्याबाबत आवाज उठवला. ठेकेदारांच्या कामावर नाराजी व्यक्त करीत संबंधित ठेकेदारांचे बिल अडवण्याबाबत सूचनाही मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये कितपत यश मिळणार हे येणारा काळच ठरविल.
आजऱ्याच्या मुख्यबाजारपेठेत मलिक बुरुड यांच्या कोम्प्लेक्स समोरील मुख्य गटारीवरील स्लॅब तुटून त्याच्या सळ्या बाहेर पडलेल्या आहेत. या गटारीवरून वाहनांची सतत वाहतूक होत असते. त्याचबरोबर दोन महिन्यापूर्वी या बोळात सिमेंटचे ब्लॉक घातले होते कित्येक वर्षानंतर या गल्लीतील लोकांना चांगला रस्ता मिळाल्याचे समाधान झाले होते परंतु ब्लॉक बसवल्यानंतर 20ते 21 दिवसातच पाण्याची पाईप लाईन घालण्यासाठी हे ब्लॉक खोदण्यात आले आहेत. त्यामुळे बोळातील रस्त्याची पूरती दुर्दशा झाली आहे. गटारीला पडलेले भगदाड आणि त्यातून बाहेर पडलेल्या सळ्या यामुळे एखाद्याचा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता आहे.मुख्य बाजारपेठ असल्याने या ठिकाणी खेडेगावतील महिलांचा वावर जास्त आहे. एखाद्या महिलेचा पाय अडकून मोडल्यावर प्रशासनाला जाग येणार काय? असा सवाल मलिक बुरुड यांनी केला आहे.
कुंभार गल्लीतील संपूर्ण रस्ता खोदून ठेवला आहे. दर्गागल्लीच्या मस्जिदपासून ते खत संघापर्यंत संपूर्ण रस्ता खोदला आहे. दोन ते अडीच फूट खुदाई केल्यामुळे सिद्धार्थ नगर,प्रजापीता कॉलनी आणि दीडबाग कॉलनीतील लोकांना येजा करणे अडचणीचे झाले आहे.खुदाईमुळे घातलेल्या नवीन पाईप लाईनचा बट्ट्याबोळ झाला आहे. पाण्याचे हॉल्व्ह तुटून दिवसभर पाणी गटारीतून आणि रस्त्यावरून वाहत होते. याबाबत प्रशासनाला विचारले असता त्यांनी हात झटकून ठेकेदारवर सर्वकाही ढकलले.
मागील दोन वर्षापासून घंटागाडीच्या कर्मचाऱ्यांना पगार वेळेत होत नसल्याने कालपासून घंटागाडी कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता नगरपंचायतीकडे बजेट नसल्याचे कारण देण्यात आले. ठेकेदाराला बिल दिलेले नसल्याने ठेकेदाराने कामगारांचा पगार दिलेला नाही. सतरा वॉर्डात एकूण पाच घंटागाड्या फिरत असल्याची नोंद आहे. परंतु सद्या प्रत्यक्षात दोन ते तीनच गाड्या सतरा वॉर्डात काम करीत आहेत. तर दोन गाड्या गंजून पूर्णपणे खराब झाल्याचे दिसत आहेत.
या गाड्यांची देखभाल दुरुस्ती संबंधित ठेकेदारकडून वेळेत होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. पगार मागितला की कामगारांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते असे सांगितले आहे. सुट्टी नाही, बोनस नाही, कोणतीही सुविधा नाही,तुटपुंज्या पगारात काम करीत महागाईच्या काळात कुटुंबाचा गाडा हाकणे मुश्किल झाले आहे तरीसुद्धा या कामगारांची दखल घेणारा कोणीही नाही हे दुर्दैव्य आहे. एक कामगार कोरोना काळातसुद्धा प्रामाणिकपणे काम करुनसुद्धा आता कामगार जास्त आहेत हे कारण पुढे करीत त्याला कामावरून कमी केले आहे. त्या गरीब कामगाराने आता जायचे कुठे?, घर चालवायचे कसे? अशी खंत आमच्या प्रतिनिधीसमोर मांडली.
चाळीस वर्षांपूर्वीची काशिनाथ अण्णांनी घातलेली पाईपलाईन आजही सुस्थितीत आहे आणि आता 27कोटीची पाणीयोजना पहिल्या वर्षातच ढेपाळलेली दिसत आहे. त्यामुळे भविष्यात याचा नागरिकांना फटका बसणार आहे असे काही सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.
धूळ, चिखल, पाणी, आरोग्य, कचरा अशा अनेकविध समस्यांचे निराकरण करण्यात नूतन नगरसेवक यशस्वी होणार का? याचे उत्तर येणारा काळच देईल यात शंका नाही.
आजरेकरांच्या समस्यांचे समाधान करण्यात नूतन नगरसेवक यशस्वी होतील काय?
|