बातम्या
बेनिग्रे ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात तरुण आक्रमक; चौकशीची मागणी, ग्रामसभा न झाल्यास साखळी उपोषणाचा इशारा
By nisha patil - 3/8/2026 9:52:01 PM
Share This News:
बेनिग्रे ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात तरुण आक्रमक; चौकशीची मागणी, ग्रामसभा न झाल्यास साखळी उपोषणाचा इशारा
कागल प्रतिनिधी अजित बोडके बेनिग्रे ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत गेल्या अनेक दिवसांपासून गावातील तरुणांकडून विविध मुद्द्यांवर चौकशीची मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत 30 जुलै रोजी आवश्यक माहिती देण्यात येईल, असे लेखी देण्यात आले होते. मात्र, संबंधित ग्रामसेवक वैद्यकीय रजेवर असल्याचे कारण देत ही माहिती अद्याप ही मिळालेली नाही.
यावेळी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत तरुणांनी प्रशासनावरही नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हापरिषद अध्यक्षा यांची भेट घेऊन "आमच्या कारभाराची चौकशी करावी, आमचा कारभार पारदर्शक आहे," असे निवेदन दिल्याचा उल्लेख करत तरुणांनी त्यावरही टीका केली. "स्वतःच्या कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी ही कदाचित पहिलीच ग्रामपंचायत असेल," अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय, ग्रामसेवक रजेवर गेल्यानंतर अनेक दिवस ग्रामपंचायतीचे कार्यालय बंद असल्याचा आरोपही करण्यात आला. या काळात पर्यायी प्रशासकीय व्यवस्था किंवा कारभार कोणाकडेही सोपविण्यात आला नसल्याचा मुद्दा उपस्थित करत याबाबत गटविकास अधिकारी (बीडीओ) यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याचे तरुणांनी सांगितले.
दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी नियोजित ग्रामसभा झाली नाही किंवा ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत समाधानकारक माहिती देण्यात आली नाही, तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थ व तरुणांनी दिला आहे.
बेनिग्रे ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात तरुण आक्रमक; चौकशीची मागणी, ग्रामसभा न झाल्यास साखळी उपोषणाचा इशारा
|