बातम्या

अखेर युवाशक्ती जिंकली.. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

Yova shakti


By nisha patil - 7/25/2026 9:49:33 PM
Share This News:



**अखेर युवाशक्ती जिंकली.. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा*

*आजऱ्यात वंचित बहुजनच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव*

*आजरा(हसन तकीलदार)*:-दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरु असलेल्या युवा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले. संविधानिक पद्धतीने, लोकशाही मार्गाने आपल्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी युवा विद्यार्थ्यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर शांत व संयमी मार्गाने लढा सुरु केला होता. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी करीत आंदोलन सुरु होते. या देशव्यापी आंदोलनाच्या दबावामुळे अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार आजऱ्यातही हा बंद यशस्वीरित्या पार पडला होता. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देताच वंचित बहुजन आघाडी, आजरा तालुका सेक्युलर मूव्हमेंट, रिपब्लिकन सेना, दलित मानवी हक्क आदी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत शिवतीर्थासमोर व छत्रपती संभाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला.

      एकीकडे सोनम वांगचूक यांचे 26 दिवसांचे उपोषण, सीजेपी आंदोलन सुरु असतानाच काँग्रेस खासदार व विरोधी पक्ष नेते राहुलगांधी, मल्लिकार्जुन खडगे यांनी वेगळ्या पद्धतीने लढा देऊन विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करणाऱ्याना शिक्षा करा, धर्मेंद्र प्रधान यांना बडतर्फ करा, प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय संसदेत चर्चा नाही अशी भूमिका घेतल्याने दुहेरी दबाव निर्माण झाला. त्याचप्रमाणे जंतर मंतरवर सुरु झालेले आंदोलन केवळ दिल्लीपुरते मर्यादित राहिले नाही तर महाराष्ट्रासह अनेक राज्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. विद्यार्थ्यांचे आंदोलन देशव्यापी होण्यास सुरवात झाल्यामुळे सरकारला अधिक दुर्लक्ष करणे शक्य होत नव्हते. युवापिढीचा वाढत चाललेला विरोध आणि नाराजी निवडणूकांसाठी धोकादायक ठरु शकते हे सरकारने ओळखले व अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. सोशल मीडियाने आपली खरी भूमिका बजावली. मेनस्ट्रीम मीडिया पेक्षा सोशल मीडियाने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका बजावली. खऱ्या अर्थाने त्यांचाच सिंहाचा वाटा राहिला.

      विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्क लढ्याला मिळालेल्या या यशाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, सेक्युलर मूव्हमेंट आजरा, दलित मानवी हक्क संरक्षण संघटना, रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवतीर्थासमोर आणि छत्रपती संभाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, विद्यार्थी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दाणाणून सोडला.

   यावेळी संतोष मासोळे(वंचित बहुजन आघाडी), दत्तात्रय कांबळे, भिकाजी कांबळे, प्रवीण कश्यप, अजय देशमुख (सेक्युलर मूव्हमेंट), महेश कांबळे, गोपाळ होण्याळकर (रिपब्लिकन सेना ), सुरेश दिवेकर, अविनाश कांबळे, विष्णू मेंढोलीकर (दलित मानवी हक्क), दौलती कांबळे आदी जणांसह संविधान व लोकशाही प्रेमी उपस्थित होते.


अखेर युवाशक्ती जिंकली.. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Total Views: 348