बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘युवान’ अभियानाचे उत्साहात उद्घाटन
By nisha patil - 8/14/2026 8:18:07 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘युवान’ अभियानाचे उत्साहात उद्घाटन
कोल्हापूर दि.14 : विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि प्रवाह फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवान अभियान’ चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. युवकांमधील ऊर्जा, सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकीला सकारात्मक दिशा देण्याच्या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. अभिजीत कुलकर्णी यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “युवक हे राष्ट्राचे भविष्य आहेत. आपल्या सामर्थ्याचा आणि ऊर्जेचा योग्य उपयोग करून समाज व राष्ट्राच्या विकासासाठी योगदान द्या.” युवकांनी निसर्ग व पाण्याचे संवर्धन करावे, प्लास्टिकचा वापर कमी करावा तसेच दररोज किमान एक तास समाजासाठी काम करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
युवान अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, आरोग्य, शिक्षण, गडकिल्ले संवर्धन, पशुसंवर्धन यांसह विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये युवकांना कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभागी होऊन समाजोपयोगी कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही श्री. कुलकर्णी यांनी सांगितले. “नेहमी कृतज्ञतेचा भाव ठेवा आणि ‘मी’पासून ‘आम्ही’कडे प्रवास करा,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी युवकांना दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी युवकांच्या सकारात्मक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “युवक हे भारताचे भविष्य आहेत. युवकांच्या ऊर्जेला सकारात्मक दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘युवान’ अभियानाच्या माध्यमातून होत आहे. युवकांना त्यांच्या सुप्त गुणांना व सामाजिक जाणीवेला वाव देण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम या अभियानातून केले जाते.” विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी केले. त्यांनी ‘युवान अभियानाची’ उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांचा सहभाग याबाबत माहिती दिली. डॉ. राजश्री पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.
कार्यक्रमाचे आभार डॉ. प्रवीण बागडे यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉ. संपदा ठिकपुर्ले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे तसेच सदानंद दुर्गुळे यांचे सहकार्य लाभले. यावेळी एन.एस.एस.च्या स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सामाजिक कार्याची नवी दिशा स्वीकारण्याचा संकल्प केल्याने ‘युवान अभियानाचा’ उद्घाटन सोहळा प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘युवान’ अभियानाचे उत्साहात उद्घाटन
|