बातम्या
अंबाबाईच्या गरूड मंडपाचे काम रखडले; नवरात्रोत्सवात देवी सदरेवर विराजमान होणार?
By Shivani - 8/8/2026 8:44:34 AM
Share This News:
अंबाबाईच्या गरूड मंडपाचे काम रखडले; यंदाच्या नवरात्रौत्सवात देवी सदरेवर विराजमान होणार का?
कोल्हापूर :
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासमोरील ऐतिहासिक गरूड मंडपाच्या नूतनीकरणाचे काम रखडल्याने यंदाच्या नवरात्रौत्सवात देवी अंबाबाई गरूड मंडपातील सदरेवर विराजमान होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. लाखो भाविकांच्या श्रद्धेशी जोडलेल्या या कामाला सुरुवात होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी होत आला आहे. मात्र, कामाची गती संथ असल्याने मंदिरातील पारंपरिक धार्मिक विधींवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गरूड मंडप, मणिकर्णिका कुंड आणि महाद्वारातील नगरखाना यांच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारने एकत्रित २१ कोटी ६८ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. यापैकी गरूड मंडपाच्या नूतनीकरणासाठी १२ कोटी ८५ लाख रुपये खर्चाचा समावेश आहे. पुरातत्त्व विभागामार्फत हे काम सुरू आहे.
गरूड मंडप उतरविण्याचे काम २०२४ च्या उत्तरार्धात सुरू करण्यात आले. त्यानंतर २०२५च्या सुरुवातीला प्रत्यक्ष नूतनीकरणाला सुरुवात झाली. काम पूर्ण करण्यासाठी मार्च २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, लाकडी खांबांच्या उपलब्धतेचा प्रश्न आणि कामाची संथ गती यामुळे निर्धारित वेळेत काम पूर्ण झाले नसल्याचे चित्र आहे. यामुळे यंदाच्या नवरात्रौत्सवात देवी अंबाबाईला पारंपरिक पद्धतीने गरूड मंडपातील सदरेवर विराजमान करता येणार का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
गरूड मंडप हा साधासुधा मंडप नसून कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. कोल्हापूर गॅझेटियरमध्ये या मंडपाचा ‘गरूड सभा मंडप’ असा उल्लेख आढळतो. करवीर संस्थानचे पॉलिटिकल एजंट दाजी पंडितराव यांच्या कार्यकाळात १८३८ ते १८४३ दरम्यान मंदिरासमोर हा भव्य लाकडी मंडप उभारण्यात आला होता. या मंडपाला एकूण ४८ खांब असून त्यापैकी आठ मुख्य भारवाहक खांब आहेत. मंडपाची उंची सुमारे २० फूट, तर भारवाहक खांबांचा आकार १५ बाय १५ इंच आहे. उर्वरित ४० खांब दुय्यम आधार आणि सजावटीसाठी वापरले जातात. तज्ज्ञांच्या पाहणीत चार भारवाहक खांबांना वाळवी लागल्याचे आढळून आले. त्यामुळे हे खांब बदलणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर मंडपाच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली.
मंडपाच्या नूतनीकरणासाठी अंदाजपत्रक तयार करून शासनाची मंजुरी घेण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष कामाची वर्कऑर्डर देताना २० फूट लांबीचे आवश्यक लाकूड उपलब्ध आहे की नाही, याची पुरेशी खातरजमा झाली का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मंडप उतरवल्यानंतर आवश्यक लाकडाच्या शोधासाठी कंत्राटदाराला धावपळ करावी लागल्याचे सांगितले जाते. त्यानंतर खांब उपलब्ध झाले; मात्र जागेवर बसविण्यापूर्वीच त्यातील लाकूड तडकले. आता नव्या लाकडाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे कामाला आणखी विलंब झाला आहे.
अंबाबाई मंदिरातील धार्मिक परंपरांमध्ये गरूड मंडपाला विशेष महत्त्व आहे. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर उत्सव, नगरप्रदक्षिणा किंवा पालखी सोहळ्याच्या वेळी देवीची पालखी प्रथम गरूड मंडपाच्या सदरेवर येते आणि त्यानंतर पुढील प्रवास सुरू होतो, अशी परंपरा आहे. मात्र, गरूड मंडपाचे काम अपूर्ण असल्याने सध्या पालखीला शेजारील मंडपात विराजमान करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नूतनीकरणाचे काम आणखी लांबल्यास यंदाच्या नवरात्रौत्सवातील पारंपरिक व्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
अंबाबाई मंदिर हे कोल्हापूरचेच नव्हे तर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे मंदिराच्या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करताना केवळ बांधकाम पूर्ण करणे पुरेसे नाही, तर मंदिरातील नित्यनैमित्तिक पूजा, धार्मिक विधी आणि पारंपरिक सोहळ्यांवर परिणाम होणार नाही, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे.
सार्वजनिक बांधकामाच्या दिरंगाईकडे एक प्रकारे पाहता येऊ शकते; मात्र धार्मिक परंपरांशी जोडलेल्या वास्तूच्या कामात नियोजनातील त्रुटींमुळे विलंब होत असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे. आता नव्या लाकडाची व्यवस्था झाल्यानंतर गरूड मंडपाचे काम नेमक्या किती वेगाने पूर्ण होते आणि यंदाच्या नवरात्रौत्सवापूर्वी देवी अंबाबाईला पुन्हा ऐतिहासिक सदरेवर विराजमान करता येते का, याकडे कोल्हापूरकरांसह लाखो भाविकांचे लक्ष लागले आहे.
अंबाबाई गरूड मंडप नूतनीकरण
|