शैक्षणिक

कोकण-कोल्हापूरचा ‘राजमार्ग’ आता महाराष्ट्राचा!

board exam rajmarg maharashtra ssc hsc planning 2026


By Shivani - 5/9/2026 11:43:46 AM
Share This News:



कोकण-कोल्हापूरचा ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ आता महाराष्ट्रभर; दहावी-बारावीच्या नियोजनाला राज्यस्तरीय दिशा

कोल्हापूर :

बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी कोकण आणि कोल्हापूर विभागीय मंडळांनी सुरू केलेल्या ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ या अभिनव उपक्रमाची राज्य मंडळाने दखल घेतली असून, आता या संकल्पनेला संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तयारी केवळ परीक्षा जवळ आल्यानंतर न करता संपूर्ण वर्षभर नियोजनबद्ध पद्धतीने करण्यासाठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना एकसंध दिशा मिळणार आहे.

राज्य मंडळाच्या सप्टेंबर २०२६ च्या ‘शिक्षण संक्रमण’ विशेषांकात ‘इयत्ता दहावी-बारावी परीक्षेचा राजमार्ग’ या संकल्पनेवर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे कोकण-कोल्हापूरमध्ये प्रत्यक्ष कामातून विकसित झालेला हा प्रयोग आता राज्यातील शाळांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

वर्षभराच्या नियोजनाला मिळणार एकसंध दिशा

बोर्ड परीक्षा जवळ आली की अभ्यासक्रम पूर्ण करणे, सराव परीक्षा घेणे, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन, परीक्षा अर्ज भरणे आणि प्रशासकीय तयारी अशा अनेक कामांची धावपळ सुरू होते. मात्र या सर्व बाबी वर्षभर आधीपासून नियोजनबद्ध केल्यास परीक्षेचा ताण कमी होऊन विद्यार्थ्यांची तयारी अधिक प्रभावी होऊ शकते.

याच उद्देशाने ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ ही संकल्पना तयार करण्यात आली आहे. आज काय करायचे, पुढील महिन्यात कोणते उद्दिष्ट पूर्ण करायचे आणि विद्यार्थ्यांच्या तयारीचा आढावा कसा घ्यायचा, यासाठी या उपक्रमातून कार्यपद्धती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘राजमार्ग’ म्हणजे केवळ मार्गदर्शक पुस्तिका नव्हे

‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ हा केवळ सूचना किंवा मार्गदर्शक पुस्तिका नसून बोर्ड परीक्षा व्यवस्थापनाचा वर्किंग रोडमॅप म्हणून पाहिला जात आहे.

अभ्यासक्रम पूर्ण करण्यापासून ते विषयवार सराव, उत्तरलेखन, शंका निरसन, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा आणि विशेष मार्गदर्शनापर्यंत विविध टप्प्यांचे नियोजन यामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे ‘अभ्यासक्रम पूर्ण झाला का?’ याबरोबरच ‘विद्यार्थी परीक्षेसाठी खरोखर तयार झाला आहे का?’ हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगळे नियोजन

या उपक्रमाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू विद्यार्थी-केंद्रित नियोजन हा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची क्षमता, गती आणि परिस्थिती वेगळी असते. काही विद्यार्थी अभ्यासात पुढे असतात, तर काही विद्यार्थ्यांना मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि मार्गदर्शनाची गरज असते.

मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांची वेळेत ओळख करून त्यांना अतिरिक्त सराव, शंका निरसन आणि विशेष मार्गदर्शन देण्यावर या संकल्पनेत भर देण्यात आला आहे. त्यामुळे बोर्ड परीक्षेतील यश केवळ गुणवंत विद्यार्थ्यांच्या निकालापुरते मर्यादित न राहता प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

विद्यार्थी-पालक-शिक्षक-शाळा यांच्यात समन्वय

बोर्ड परीक्षेच्या तयारीमध्ये पालकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्याची उपस्थिती कमी होणे, अभ्यासात सातत्य नसणे, एखादा विषय कठीण जाणे किंवा परीक्षेची भीती निर्माण होणे, अशा समस्या वेळेत ओळखणे आवश्यक आहे.

यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शाळा यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यावर ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ या उपक्रमातून भर दिला जाणार आहे.

प्रशासकीय चुका टाळण्यासाठीही नियोजन

बोर्ड परीक्षेच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी शैक्षणिक तयारीबरोबरच प्रशासकीय अचूकताही महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत ठेवणे, परीक्षा अर्ज वेळेत भरणे, कागदपत्रे व नोंदी व्यवस्थित ठेवणे, मंडळाशी संबंधित प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आणि परीक्षा काळातील जबाबदाऱ्या निश्चित करणे, यामुळे ऐन परीक्षेच्या काळातील अनावश्यक ताण कमी होणार आहे.

त्यामुळे चांगले अध्यापन आणि सक्षम प्रशासन ही बोर्ड परीक्षेच्या यशाची दोन चाके असल्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.

स्थानिक प्रयोगाला राज्य मंडळाची मान्यता

कोकण आणि कोल्हापूर विभागीय मंडळांनी स्थानिक पातळीवरील गरज लक्षात घेऊन सुरू केलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर राज्य मंडळाने त्याची दखल घेतली आहे.

विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्य मंडळाने त्याला व्यापक स्वरूप देत राज्यभरातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

राजेश क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळांनी मागील वर्षापासून सुरू केलेल्या या सर्वसमावेशक उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. परीक्षा नियोजन सुलभ झाले असून या उपक्रमाची दखल राज्य मंडळाने घेऊन राज्यस्तरावर विस्तार केला, ही समाधानाची बाब आहे.”

पाच जिल्ह्यांकडून उपक्रमाला अधिक गती देण्याचा निर्धार

ऑगस्ट अखेरीस झालेल्या ऑनलाइन बैठकीत कोल्हापूर विभागातील सुवर्णा सावंत (कोल्हापूर), राजेसाहेब लोंढे (सांगली), धनंजय चोपडे (सातारा) तसेच कोकण विभागातील दीपक मेंगाने (रत्नागिरी), विनायक पाटील (सिंधुदुर्ग) या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मनोदय व्यक्त केला.

यावेळी मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष सचिन नलावडे, संदेश राऊत तसेच पाचही जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष आर. डी. पवार (कोल्हापूर), संजयकुमार झांबरे (सांगली), वामन तरफे (सिंधुदुर्ग), आयुब मुल्ला (रत्नागिरी), संजय यादव (सातारा) यांनीही राज्य मंडळाच्या निर्णयाचे स्वागत केले.

निकालाच्या टक्केवारीपलीकडे ‘राजमार्ग’

बोर्ड परीक्षेतील यश अनेकदा केवळ निकालाच्या टक्केवारीत मोजले जाते. मात्र विद्यार्थ्याला वर्षभर सातत्यपूर्ण सराव, योग्य मार्गदर्शन, उत्तरलेखनाची सवय, शंका निरसन आणि मानसिक तयारी मिळाली, तर त्याचा परीक्षेतील आत्मविश्वास वाढू शकतो.

‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ ही संकल्पना निकाल वाढविण्यापुरती मर्यादित न राहता परीक्षा व्यवस्थेला अधिक नियोजनबद्ध, विद्यार्थी-केंद्रित आणि मानवी बनविण्याचा प्रयत्न आहे.

कोकण आणि कोल्हापूरमध्ये सुरू झालेली ही वाट आता महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर आली आहे. कागदावरील नियोजन प्रत्यक्ष वर्गात किती प्रभावीपणे पोहोचते, मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना किती मदत मिळते आणि शाळांच्या दैनंदिन कामकाजात त्याचा किती परिणाम दिसतो, यावर या उपक्रमाचे खरे यश अवलंबून राहणार आहे.

बोर्ड परीक्षेचा निकाल ज्या दिवशी जाहीर होतो, त्याच्या अनेक महिने आधी त्या निकालाचा ‘राजमार्ग’ तयार होत असतो. आता हा राजमार्ग संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी खुला झाला आहे.


कोकण-कोल्हापूरचा ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ आता महाराष्ट्रभर; दहावी-बारावी परीक्षेच्या नियोजनाला राज्यस्तरीय दिशा
Total Views: 42