बातम्या

बाप्पाची मूर्ती मोठी नको, भक्ती मोठी हवी! गणरायाचा भावनिक संदेश

ganpati bappa murti mothi nako bhakti mothi havi


By Shivani - 5/9/2026 11:52:51 AM
Share This News:



मी तुमचा लाडका बाप्पा बोलतोय… माझं रूप नाही, माझी भक्ती जपा!

कोल्हापूर : प्रतिनिधी |(अमृता बुगले) - 

मी तुमचा लाडका गणपती बाप्पा बोलतोय…येतोय ना मी…म्हणून माझ्या स्वागताची लगबग सुरू झाली असेल ना? कुठे माझ्यासाठी भव्य मांडव उभा राहत असेल, कुठे मखर सजवलं जात असेल, कुठे ढोल-ताशे, बँड आणि वाद्यांची तयारी सुरू असेल, तर कुठे माझ्या आगमनासाठी आतषबाजीची तयारी सुरू असेल.मला माहीत आहे, मी येणार म्हटलं की तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच वेगळा असतो. माझ्यासाठी तुम्ही किती काही करता,हे पाहून मलाही खूप आनंद होतो. कारण मला तुमच्या मंडळात यायला आवडतं, तुमच्या घरात विराजमान व्हायला आवडतं, तुमच्या हातचा प्रसाद खायला आवडतो, सकाळ-संध्याकाळ तुमच्या भक्तिभावाने होणारी आरती ऐकायला आवडते. हे काही दिवस माझ्यासाठीही खूप खास असतात.

या सगळ्या आनंदाच्या गर्दीत एक गोष्ट मात्र माझ्या मनाला टोचते, तुम्ही मला माझ्या आईने दिलेल्या त्या साध्या, सुंदर रूपात का स्वीकारत नाही? माझे मोठे सुपासारखे कान, मोठंसं पोट, गोंडस वळणदार सोंड आणि चेहऱ्यावरचं निरागस हास्य...हेच तर माझं खरं रूप!

पण काळ बदलला आणि तुमची माझ्याबद्दलची कल्पनाही बदलली. एकमेकांपेक्षा मोठं करण्याच्या स्पर्धेत कधी मला वेगवेगळ्या देवांच्या रूपात उभं केलं जातं,  कधी हवेत बॅलन्सिंग करणारी माझी मूर्ती बनवली जाते, कधी २० फूट, कधी २१ फूट, तर कधी त्याहूनही मोठी माझी प्रतिमा उभी केली जाते. पण कधी विचार केलात का? “बाप्पाला हे खरंच आवडत असेल का?”

माझ्या लेकरांनो…माझं मोठेपण माझ्या मूर्तीच्या उंचीत नाही,तुमच्या भक्तीच्या उंचीत आहे. याच मोठेपणाच्या नादात यंदा काही ठिकाणी माझ्या आगमनावेळीच माझ्या मूर्ती कोसळल्या. काही ठिकाणी माझ्या मूर्ती अंगावर पडून जीव गेले. कुठे मूर्तींना तडे गेले तर कुठे माझं रूपच विद्रूप झालं. हे पाहून तुम्हीही दुःखी झाला आणि माझं मनही तुटलं… कारण काही वर्षांपासून माझ्या विसर्जनाच्या वेळीही मी हेच दुःख सहन करत आलोय. अयोग्य पद्धतीने विसर्जन करताना माझ्या मूर्तीचे तुकडे होतात, माझं रूप विखुरलं जातं, मला वेदना होतात पण तरीही मी सगळं सहन करतो. का? कारण तुम्ही माझे लेकरं आहात… तुम्ही माझ्यावर प्रेम करता, भक्ती करता, म्हणून तुमच्या चुका मी माफ करतो. आणि म्हणूनच… दरवर्षी पुन्हा तुमच्या घरी येतो… तुमच्या मंडळात येतो… तुमच्या आनंदाचा भाग बनतो.

पण आता एकदा माझ्यासाठी विचार करा… माझ्या मूर्तीशी स्पर्धा करण्याऐवजी माझ्या भक्तीशी स्पर्धा करा. माझी मूर्ती मोठी करण्याऐवजी तुमचं मन मोठं करा. 
माझं रूप वेगळं करण्याऐवजी माझ्या विचारांना तुमच्या आयुष्यात जागा द्या. मला भव्य-दिव्य रूप नको, मला हवेत बॅलन्सिंग करणारी मूर्ती नको, मला २०-२१ फूट उंचीची मूर्तीही नको, मला फक्त तुमच्या मनातली खरी भक्ती हवी आहे. माझी छोटीशी प्रतिकृती असेल तरी मला चालेल. पण ती सुरक्षित ठेवा, तिचा आदर करा, विसर्जनही योग्य पद्धतीने करा आणि गणेशोत्सव असा साजरा करा. माझ्या आगमनाने आनंद यावा आणि माझ्या विसर्जनानेही फक्त भक्तीच्या आठवणी उराव्यात… दुःखाच्या नाही. कारण शेवटी…मी मूर्तीत नाही, मी तुमच्या श्रद्धेत आहे. म्हणून यंदा माझ्यासाठी एकच संकल्प करा… बाप्पाची मूर्ती मोठी नको…बाप्पावरील भक्ती मोठी हवी!


मी तुमचा लाडका बाप्पा बोलतोय… माझं रूप नाही, माझी भक्ती जपा!
Total Views: 9