बातम्या
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा तेजी; चार दिवसांत ८,४०० रुपयांची वाढ, आजचा भाव किती?
By Shivani - 8/8/2026 8:42:21 AM
Share This News:
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा तेजी; चार दिवसांत ८,४०० रुपयांची वाढ, आजचा भाव किती?
सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आजची महत्त्वाची बातमी आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काहीसं स्वस्त झालेलं सोनं आता पुन्हा महागलं आहे. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल ८ हजार ४०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव
८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजताच्या Goodreturnsच्या आकडेवारीनुसार, मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूरसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ५२ हजार ३५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. म्हणजेच २४ कॅरेट सोन्याचा दर १५ हजार २३५ रुपये प्रति ग्रॅम इतका आहे.
२२ आणि १८ कॅरेट सोनं कितीला?
दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी २२ कॅरेट सोन्याचा भाव महत्त्वाचा असतो. सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३९ हजार ६५० रुपये प्रति १० ग्रॅम, म्हणजेच १३ हजार ९६५ रुपये प्रति ग्रॅम आहे.
तर १८ कॅरेट सोन्याचा दर १ लाख १४ हजार २६० रुपये प्रति १० ग्रॅम, म्हणजेच ११ हजार ४२६ रुपये प्रति ग्रॅम आहे. मात्र, दागिने खरेदी करताना सोन्याच्या दरासोबत मेकिंग चार्ज आणि जीएसटीचा अतिरिक्त खर्च ग्राहकांना करावा लागतो.
चार दिवसांत सोनं ८,४०० रुपयांनी महाग
सोन्याच्या दरातील तेजी किती मोठी आहे, याचा अंदाज गेल्या चार दिवसांतील दरवाढीवरून येतो. या कालावधीत सोनं प्रति तोळा ८ हजार ४०० रुपयांनी महागलं आहे. आजच्या व्यवहारातही सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १ हजार ९० रुपयांची वाढ झाली आहे. तर प्रति ग्रॅम सोनं १०९ रुपयांनी महागलं आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या दरात जवळपास ८ हजार रुपयांची वाढ झाली आहे.
चांदीचा भाव स्थिर
एकीकडे सोन्याच्या दरात वाढ होत असताना चांदीच्या दरात मात्र आज फारसा बदल झालेला नाही. ८ ऑगस्ट रोजी चांदीचा भाव २ लाख ४५ हजार रुपये प्रति किलो इतका आहे.
त्यामुळे सध्या सोने-चांदी बाजारात सोन्याच्या वाढत्या दराकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. लग्नसराई किंवा इतर कारणांसाठी सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दरवाढीचा थेट परिणाम बजेटवर होऊ शकतो.
सोन्याचा भाव पुढे काय राहणार?
ऑगस्टच्या सुरुवातीला नरमलेले सोन्याचे दर आता पुन्हा वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी तेजी येणार की दर काही प्रमाणात कमी होणार, याकडे ग्राहक आणि सराफा बाजाराचे लक्ष लागले आहे.
आजचा सोन्याचा दर
|