बातम्या
सोन्याच्या दराला अचानक ब्रेक! 1.60 लाखांवरून थेट 1.58 लाखांवर घसरण; खरेदीची संधी?
By Shivani - 8/27/2026 5:04:41 PM
Share This News:
सोन्याच्या दराला अचानक ब्रेक! 1.60 लाखांवरून थेट 1.58 लाखांवर घसरण; खरेदीची संधी?
मुंबई :
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुरुवार, 27 ऑगस्टचा दिवस सुरुवातीला तेजीचा ठरला; मात्र दुपारपर्यंत सोन्याच्या दरात अचानक घसरण झाली. सकाळी एमसीएक्सवर ऑक्टोबर गोल्ड फ्युचर्सचा भाव 1 लाख 60 हजार 108 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला होता. मात्र दुपारी 12 वाजेपर्यंत सोन्याचा भाव 0.54 टक्क्यांनी घसरून 1 लाख 58 हजार 800 रुपयांवर आला.
सकाळी सोन्याच्या दरात तेजी
27 ऑगस्ट रोजी सकाळी 9.45 वाजता एमसीएक्सवर ऑक्टोबर गोल्ड फ्युचर्समध्ये 0.28 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे सोन्याचा दर 1.60 लाख रुपयांच्या पुढे गेला. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही सुरुवातीला तेजी दिसून आली.
सप्टेंबरच्या चांदीच्या करारात 0.41 टक्क्यांची वाढ झाली आणि चांदीचा दर 2 लाख 40 हजार 625 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला.
दुपारपर्यंत बाजाराचा सूर बदलला
मात्र, सकाळची तेजी फार काळ टिकली नाही. दुपारी 12 वाजेपर्यंत सोन्याच्या दरात 0.54 टक्क्यांची घसरण झाली आणि भाव 1 लाख 58 हजार 800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. म्हणजेच सकाळच्या उच्चांकाच्या तुलनेत सोन्याच्या दरात जवळपास 1,300 रुपयांची घट झाली.
चांदीच्या दरातही घसरण झाली असून तो 2 लाख 39 हजार 469 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला.
सोन्याची घसरण म्हणजे खरेदीची संधी?
सोन्याच्या दरातील या घसरणीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सध्याची अस्थिरता ही आर्थिक चिंता, वाढते कर्ज आणि जगभरातील घडामोडींशी संबंधित आहे. मात्र, सोन्याचा दीर्घकालीन ट्रेंड अजूनही सकारात्मक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे मुख्य संशोधन अधिकारी रवि सिंह यांच्या मते, सोन्याच्या दरात आणखी काही प्रमाणात घसरण झाल्यास गुंतवणूकदारांकडून खरेदी वाढण्याची शक्यता आहे.
गुंतवणूकदारांचे लक्ष पुढील हालचालीकडे
सकाळी 1.60 लाखांचा टप्पा ओलांडणारे सोनं काही तासांत 1.58 लाखांवर आल्याने बाजारातील अस्थिरता पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणारे ग्राहक आणि गुंतवणूकदार आता पुढील काही दिवसांतील दरांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
Gold Rate Today: सोन्याचा दर 1.60 लाखांवरून 1.58 लाखांवर घसरला
|