बातम्या

केशवराव भोसले नाट्यगृहाचे खाजगीकरण रद्द

keshavraobhosale natyagruha no privatisation kolhapur news


By Shivani - 4/8/2026 4:25:25 PM
Share This News:



केशवराव भोसले नाट्यगृहाचे खाजगीकरण होणार नाही; महापालिकेचेच अंतिम नियंत्रण

कोल्हापूर : 

कोल्हापूरच्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणाबाबत सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. नाट्यगृहाची मालकी आणि अंतिम नियंत्रण कोल्हापूर महानगरपालिकेकडेच राहील, अशी स्पष्ट आणि लेखी ग्वाही महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी सोमवारी रंगकर्मींसोबत झालेल्या बैठकीत दिली.

गेल्या काही दिवसांपासून नाट्यगृहाच्या बाह्य व्यवस्थापनाच्या प्रस्तावाला विरोध करत रंगकर्मी, शाहूप्रेमी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी आंदोलन छेडले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि रंगकर्मी यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

चर्चेनंतर प्रशासनाने लेखी स्वरूपात स्पष्ट केले की, नाट्यगृहाचे अंतिम नियंत्रण आणि मालकी महानगरपालिकेकडेच राहणार आहे. प्रशासनाच्या या भूमिकेनंतर रंगकर्मींच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती रंगकर्मी संघटनेने दिली.

बैठकीला रंगकर्मी किरणसिंह चव्हाण, आनंद काळे, प्रसाद जमदग्नी, सुनील घोरपडे आणि रोहन घोरपडे उपस्थित होते.

९ ऑगस्टनंतर अंतिम निर्णय

महापालिकेने स्पष्ट केले की, नाट्यगृहाच्या व्यवस्थापनासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असली तरी संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण महापालिकेकडेच राहील. कार्यक्रमांचे दर, निविदेचा मसुदा आणि इतर अटींबाबत ९ ऑगस्टनंतर महापौर, पदाधिकारी आणि रंगकर्मी यांच्यासोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी सांस्कृतिक वारसा जपत सर्व संबंधितांच्या सूचनांनुसार पुढील धोरण निश्चित करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.


केशवराव भोसले नाट्यगृहाचे खाजगीकरण होणार नाही; महापालिकेची लेखी ग्वाही, आंदोलन स्थगित
Total Views: 13