राजकीय
काजू आंबा शेतकऱ्यांची हेक्टरी 3 लाख भरपाईची मागणी
By Shivani - 5/8/2026 5:43:50 PM
Share This News:
कोल्हापुरात काजू-आंबा बागांचे 80 टक्के नुकसान; हेक्टरी 3 लाख भरपाईची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
कोल्हापूर :
काजू आणि आंबा पिकांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या म्हणण्यानुसार, कोल्हापूर जिल्ह्यात यंदा काजू आणि आंबा बागांचे सुमारे 75 ते 80 टक्के नुकसान झाले आहे. मात्र, शासनाकडून मंजूर करण्यात आलेली हेक्टरी 22 हजार रुपयांची मदत ही झालेल्या नुकसानीच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
काजू-आंबा उत्पादकांसाठी हेक्टरी 3 लाख भरपाईची मागणी
नुकसानग्रस्त काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 3 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याने सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असे संघटनेने म्हटले आहे.
भरपाई प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी
नुकसान भरपाई मिळताना शेतकऱ्यांना विविध प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये सातबारा उताऱ्यावर काजू झाडांची नोंद नसणे, सामायिक जमीन, देवस्थान जमिनी, तसेच वारस नोंदी प्रलंबित असणे यांसारख्या समस्यांचा समावेश आहे.
या अडचणींमुळे प्रत्यक्ष शेती करणारे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने, प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना दिलेल्या निवेदनावेळी तानाजी देसाई, सखाराम केसरकर, कृष्णा पाटील, निवृत्ती कांबळे, भिकाजी कांबळे, कुंडलिक गुरव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Swabhimani Shetkari Sanghatana
|