राजकीय
E20 Petrol Controversy: कोल्हापुरात आंदोलन; '१५ रुपयांचे पेट्रोल कुठे गेले?' म्हणत केंद्र सरकारला सवाल
By Shivani - 7/16/2026 3:19:27 PM
Share This News:
'१५ रुपयांचे पेट्रोल कुठे गेले?' E20 पेट्रोलवरून कोल्हापुरात संताप; आंदोलकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
कोल्हापूर : E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पडली आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे ग्राहकांना फायदा होईल, पेट्रोलचे दर कमी होतील असे दावे करण्यात आले होते, मग प्रत्यक्षात पेट्रोल स्वस्त का झाले नाही? असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली.
आंदोलनादरम्यान जुन्या व्हिडिओंचा दाखला देत आंदोलकांनी केंद्रीय मंत्र्यांच्या पूर्वीच्या वक्तव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "१५ रुपयांचे पेट्रोल देण्याचे आश्वासन कुठे गेले?" असा सवाल करत सरकारला जाब विचारण्यात आला.
आंदोलकांनी आरोप केला की, E20 पेट्रोलच्या सक्तीमुळे सर्वसामान्य वाहनधारकांना आर्थिक फटका बसत आहे. वाहनांचे मायलेज कमी होणे, इंजिनच्या देखभालीचा खर्च वाढणे यासारख्या समस्या निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी "स्वतःच्या इथेनॉल फॅक्टऱ्यांच्या फायद्यासाठीच E20 पेट्रोलची सक्ती केली जात आहे का?" असा गंभीर आरोप करत या प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणीही आंदोलकांनी केली.
कोल्हापुरातील आंदोलनात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. "E20 पेट्रोल म्हणजे ग्राहकांची लूट" असा आरोप करत आंदोलकांनी केंद्र सरकारने या धोरणाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, कारवाईच्या धमक्यांना घाबरणार नसून ग्राहकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत राहणार आहोत. E20 पेट्रोलबाबत सरकारने जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही त्यांनी केली.
Central Government Fuel Policy
|