बातम्या
कोल्हापुरात ३ वर्षांत २७ कोटींची वीज चोरी उघड; महावितरणची मोठी कारवाई, ४ हजार ६५२ ग्राहकांवर गुन्हे
By Shivani - 3/8/2026 12:23:55 PM
Share This News:
कोल्हापुरात वीज चोरीचा धक्कादायक आकडा; तीन वर्षांत २७ कोटींचा महसूल बुडाला
कोल्हापूर :
जिल्ह्यात वीज चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे महावितरणच्या आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल २७ कोटी रुपयांहून अधिकची वीज चोरी झाल्याचे उघड झाले आहे. वीज वापरातील अनियमितता, मीटरमध्ये फेरफार आणि घरगुती वीज जोडणीचा व्यावसायिक वापर अशा प्रकारांमुळे महावितरणच्या महसुलाला मोठा फटका बसला आहे.
महावितरणच्या तपासणीत अनेक ग्राहकांकडून मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्याचे आढळून आले. अशा प्रकारात २ हजार १८६ ग्राहक दोषी आढळले असून, त्यांनी तब्बल १० कोटी ५९ लाख रुपयांची वीज चोरी केल्याचे समोर आले आहे.
याशिवाय काही ग्राहकांनी वीज वापराची वर्गवारी बदलून महसूल बुडवला आहे. घरगुती दराने व्यावसायिक वापर करणाऱ्या २ हजार ४६६ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली असून, या प्रकारातून महावितरणचा सुमारे ३ कोटी ७ लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे.
४ हजार ६५२ ग्राहकांवर कारवाई
गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत महावितरणने जिल्ह्यातील ४ हजार ६५२ ग्राहकांवर कारवाई केली आहे. वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणकडून विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत असून, संशयास्पद वीज वापर असलेल्या ग्राहकांची तपासणी वाढवण्यात आली आहे.
मीटर छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाई
वीज चोरी हा कायद्याने गंभीर गुन्हा असून, मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या तसेच चुकीच्या पद्धतीने वीज वापरणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. भविष्यातही वीज चोरी रोखण्यासाठी तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
Kolhapur MSEDCL electricity thef
|