बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात आज महावितरणचे ग्राहक समाधान शिबिर; स्मार्ट मीटरच्या शंकांचे होणार निरसन

kolhapur mahavitaran customer solution camp smart meter


By Shivani - 8/25/2026 10:48:55 AM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्यात आज महावितरणचे ग्राहक समाधान शिबिर; स्मार्ट मीटरच्या शंकांचे होणार निरसन

कोल्हापूर :

स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनातील शंका, प्रश्न आणि गैरसमज दूर करण्यासाठी महावितरणच्या कोल्हापूर मंडलातर्फे आज, मंगळवार (दि. २५ ऑगस्ट) जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालयांच्या स्तरावर ग्राहक समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर होणार असून, ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी केले आहे.

या शिबिरात स्मार्ट मीटरच्या वापराबाबत ग्राहकांना सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची माहिती अधिक सहज आणि तात्काळ उपलब्ध होत असून, ग्राहकांना दैनंदिन वीज वापरावर लक्ष ठेवून त्याचे नियोजन करता येते. मीटर रीडिंगची प्रक्रिया स्वयंचलित झाल्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन बिलिंगमध्ये अधिक अचूकता आणि पारदर्शकता येण्यास मदत होत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

तसेच, दिवसाच्या वेळेत केलेल्या वीज वापरासाठी ८५ पैसे प्रतियुनिट सवलतीचा लाभ मिळत असल्याची माहितीही ग्राहकांना शिबिरात देण्यात येणार आहे. स्मार्ट मीटरच्या सुविधांबाबत योग्य माहिती देणे आणि ग्राहकांच्या मनातील गैरसमज दूर करणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश आहे.

वीजबिलापासून मीटर तक्रारींपर्यंत मार्गदर्शन

ग्राहक समाधान शिबिरात केवळ स्मार्ट मीटरशी संबंधित प्रश्नांवरच चर्चा होणार नाही. वीजबिल, वीजपुरवठा, ग्राहकांच्या नावातील बदल, मीटरसंबंधी तक्रारी आणि इतर वीजविषयक समस्यांवरही संबंधित अधिकारी व कर्मचारी मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना तक्रारी आणि समस्यांबाबत आवश्यक मार्गदर्शन व कार्यवाही एकाच ठिकाणी मिळणार आहे.

स्मार्ट मीटरसोबत चेक मीटरचीही सुविधा

स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत शंका किंवा तक्रार असलेल्या ग्राहकांसाठी महावितरणने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अशा ग्राहकांच्या ठिकाणी स्मार्ट मीटरसोबत चेक मीटर बसविण्यात येणार आहे. दोन्ही मीटर सिरीजमध्ये जोडून पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत ग्राहकांच्या उपस्थितीत रीडिंग घेण्यात येणार आहे.

यामुळे स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत असलेल्या शंका दूर होऊन ग्राहकांचा विश्वास आणि स्मार्ट मीटरची स्वीकारार्हता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी व्यक्त केला.

आजचे शिबिर :
📍 जिल्ह्यातील सर्व महावितरण उपविभागीय कार्यालये
⏰ सकाळी ११ ते दुपारी २
📅 मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६

 


कोल्हापुरात महावितरणचे ग्राहक समाधान शिबिर; स्मार्ट मीटरच्या शंकांचे निरसन
Total Views: 11