कृषी

साखरेचे दर वाढले; सरकारचा मोठा निर्णय, 15 ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम

maharashtra sugarcane crushing season start 15 october sugar price


By Shivani - 9/9/2026 5:13:10 PM
Share This News:



साखरेचे दर वाढले; सरकारचा मोठा निर्णय, राज्यात 15 ऑक्टोबरपासून गाळप हंगाम

मुंबई :

ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर मोठा ताण आला आहे. साखरेच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील आगामी ऊस गाळप हंगामाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यंदा महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह विविध आमदार आणि साखर कारखाना संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

साखरेच्या दराने घेतली उसळी

देशातील साखरेचे उत्पादन घटल्यामुळे बाजारात साखरेचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी किरकोळ बाजारात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली. ऑगस्ट महिन्यात काही ठिकाणी साखरेचे दर 70 ते 75 रुपये किलोपर्यंत गेल्याचे पाहायला मिळाले.

साखरेच्या दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराच्या बजेटवर झाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साखरेसोबत दूध आणि डाळींच्या दरातही वाढ झाल्याने नागरिकांच्या खर्चात आणखी भर पडली आहे.

दिवाळीपूर्वी साखरेचे दर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न

गणेशोत्सवानंतर नवरात्र, दसरा आणि दिवाळी असे सणांचे दिवस सुरू होणार आहेत. या काळात मिठाई, फराळ आणि इतर खाद्यपदार्थांसाठी साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे सणासुदीच्या काळात साखरेचे दर आणखी वाढू नयेत, यासाठी सरकारकडून गाळप हंगाम लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

सामान्यतः राज्यातील ऊस गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. मात्र यंदा 15 ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांची धुराडी पेटवण्याचा सरकारचा मानस आहे.

कारखानदारांचा लवकर गाळपाला विरोध

दरम्यान, गाळप हंगाम नोव्हेंबरपूर्वी सुरू करण्याला साखर कारखानदारांकडून विरोध करण्यात आला आहे. लवकर गाळप सुरू केल्यास शेतकरी आणि कारखान्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याची भूमिका कारखानदारांनी घेतली आहे.

त्यामुळे सरकारच्या निर्णयानंतर साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची भूमिका काय राहणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

सणासुदीत साखरेचे भाव कमी होणार?

साखरेचे वाढते दर नियंत्रणात आणणे आणि आगामी सणासुदीच्या काळात बाजारात साखरेची उपलब्धता कायम ठेवणे, हे सरकारसमोरील प्रमुख आव्हान आहे. ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू झाल्यास बाजारातील साखरेचा पुरवठा वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे आगामी काळात साखरेच्या दरावर त्याचा कितपत परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

साखरेचे दर, ऊस गाळप हंगाम, महाराष्ट्र साखर कारखाने आणि साखर उद्योगाबाबत सरकारच्या पुढील निर्णयाकडे शेतकरी, कारखानदार आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.


साखरेचे दर वाढले; 15 ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू होणार!
Total Views: 14