कृषी
महाराष्ट्रात पाणी महागले! शेती, घरगुती पाणी वापराचे नवे दर लागू
By Shivani - 9/8/2026 5:47:08 PM
Share This News:
घरगुती अन् शेतीचे पाणी महागले! महाराष्ट्रात नव्या पाणी दरांची अंमलबजावणी सुरू
मुंबई :
महाराष्ट्रातील नागरिक, शेतकरी आणि उद्योगांसाठी पाणी वापराबाबत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने (MWRRA) सिंचन, घरगुती आणि औद्योगिक पाणी वापराचे नवे दर जाहीर केले असून, १ जुलै २०२६ पासून या नव्या दरांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नव्या दररचनेमुळे शेती आणि घरगुती पाणी वापराचा खर्च वाढला आहे.
शेतीच्या पाणीपट्टीत मोठी वाढ
नव्या दरांनुसार शेतीसाठी बारमाही पिकांच्या पाणीपट्टीत मोठी वाढ करण्यात आली आहे. बारमाही पिकांसाठीचा दर १,३८० रुपयांवरून २,७०० रुपये करण्यात आला आहे. तर रब्बी पिकांसाठीचा दर ७२ रुपयांवरून १८० रुपये आणि खरीप पिकांसाठीचा दर ४० रुपयांवरून ८० रुपये प्रति हेक्टर करण्यात आला आहे. यामुळे सिंचनासाठी पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
घरगुती पाण्याचे दरही वाढले
घरगुती पाणी वापरासाठीही नव्या दरांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींच्या हद्दीत पाण्याचा दर ३० पैशांवरून ४० पैसे प्रति घनमीटर, नगरपालिकांमध्ये ३५ पैशांवरून ५० पैसे, तर महापालिका क्षेत्रात ५५ पैशांवरून ८० पैसे प्रति घनमीटर करण्यात आला आहे.
प्रक्रिया उद्योगांनाही दरवाढीची झळ
औद्योगिक क्षेत्रातही काही प्रकारच्या पाणी वापरासाठी दर वाढवण्यात आले आहेत. प्रक्रिया उद्योगांसाठी पाण्याचा दर ११ रुपयांवरून १३.५० रुपये करण्यात आला आहे. तर निर्मिती उद्योगासाठी नव्या दररचनेत १६५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
पाण्याची उधळपट्टी रोखण्यासाठी मीटर सक्ती
पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा आणि पाण्याची उधळपट्टी रोखता यावी, यासाठी मीटरच्या आधारे पाणी वापर मोजण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र, सिंचन क्षेत्रात अद्याप मोठ्या प्रमाणावर मीटर पद्धतीची अंमलबजावणी झालेली नसल्याचे चित्र आहे.
नव्या पाणी दरांमुळे एकीकडे पाणी वापराचे नियमन आणि बचतीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे, तर दुसरीकडे शेती आणि घरगुती वापराच्या वाढलेल्या दरांचा नागरिक व शेतकऱ्यांवर आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पाणी महागले! शेती, घरगुती पाणी वापराचे नवे दर लागू
|