बातम्या
पंढरपूरच्या वारीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
By nisha patil - 6/8/2026 3:35:47 PM
Share This News:
पंढरपूरच्या आषाढी वारीचा जागतिक गौरव; वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विठ्ठल मंदिराची नोंद
पंढरपूर :
महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा अभिमान असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीला जागतिक स्तरावर मोठा सन्मान मिळाला आहे. अखंड विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमणाऱ्या श्रीक्षेत्र पंढरपूरची नोंद आता वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांची "एका दिवसात सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या ठिकाणांपैकी एक" म्हणून जागतिक विक्रमामध्ये नोंद झाली आहे.
दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पायी वारी करत पंढरपूरमध्ये दाखल होतात. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासह हजारो दिंड्या "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करतात. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत वारकरी पंढरीत दाखल होतात. टाळ-मृदुंगाचा निनाद, अभंगांचा गजर आणि विठ्ठलनामाचा अखंड जयघोष यामुळे संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तिमय वातावरणाने भारून जाते.
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी उपक्रमाचीही जागतिक नोंद
आषाढी वारीदरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी या उपक्रमालाही मोठा सन्मान मिळाला आहे. या उपक्रमाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सर्वात मोठे मेगा वैद्यकीय शिबिर म्हणून नोंद करण्यात आली आहे. या माध्यमातून १५ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
पंढरीच्या वारीचा जागतिक वारसा
श्रद्धा, परंपरा, सेवा आणि व्यवस्थापनाचा अनोखा संगम असलेली पंढरपूरची वारी आता जागतिक विक्रमांच्या यादीत पोहोचली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवासाठी हा क्षण अभिमानाचा मानला जात आहे.
World Book of Records Pandharpur
|