बातम्या
रक्षाबंधनासाठी एसटीची जय्यत तयारी; कोल्हापूर जिल्ह्यात १०० जादा बसेस धावणार!
By Shivani - 8/22/2026 4:47:25 PM
Share This News:
रक्षाबंधनासाठी एसटीची जय्यत तयारी; कोल्हापूर जिल्ह्यात १०० जादा बसेस धावणार!
कोल्हापूर :
भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण असलेल्या रक्षाबंधनासाठी एसटी महामंडळाने जय्यत तयारी केली आहे. सलग सुट्ट्यांमुळे प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील १२ आगारांतून तब्बल १०० जादा एसटी बसेसच्या फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगारनिहाय आणि मार्गनिहाय नियोजन करण्यात आले आहे.
येत्या बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी, त्यानंतर शुक्रवारी, २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आणि शनिवार-रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्या असा सलग सुट्ट्यांचा योग आला आहे. त्यामुळे शहरातून गावाकडे तसेच गावाकडून शहराकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
ही संभाव्य प्रवासी गर्दी लक्षात घेऊन कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज, गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड, कागल, राधानगरी, गगनबावडा आणि आजरा या १२ आगारांतून जादा एसटी बसेसच्या फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.
गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांच्या मागणीनुसार अतिरिक्त एसटी वाहतूक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रमुख बसस्थानकांवर प्रवाशांना बस, मार्ग आणि जादा फेऱ्यांची माहिती तात्काळ मिळावी, यासाठी ‘प्रवासी मित्र’ नियुक्त करण्यात आले आहेत. मार्गस्थ निवाऱ्यांवरही एसटीचे कर्मचारी तैनात राहणार आहेत.
सलग सुट्ट्यांमुळे प्रवासी गर्दीत वाढ झाल्यास परिस्थितीनुसार जादा बसेसच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे रक्षाबंधनासाठी भाऊ-बहिणींच्या भेटीला जाणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या या अतिरिक्त वाहतुकीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
रक्षाबंधन 2026: कोल्हापूर जिल्ह्यात एसटीच्या 100 जादा बसेस
|