राजकीय
साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी उपपदार्थांचे मूल्यवर्धन आवश्यक; डी. वाय. पाटील विद्यापीठात कार्यशाळा
By Shivani - 7/16/2026 4:53:08 PM
Share This News:
साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी उपपदार्थांचे मूल्यवर्धन गरजेचे; डी. वाय. पाटील विद्यापीठात कार्यशाळा
कोल्हापूर : साखर उद्योग हा केवळ साखर उत्पादनापुरता मर्यादित नसून ग्रामीण विकास, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. या उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी उपपदार्थांचे प्रभावी मूल्यवर्धन करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन सह्याद्री सहकारी साखर कारखाना, कराडचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजित शिंदे यांनी केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूरच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि स्कूल ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स अँड बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘साखर उद्योगातील उपपदार्थ व शाश्वतता’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा होते.
विश्वजित शिंदे म्हणाले, शेतकरी, ग्राहक आणि शासन यांच्यात समतोल राखणे हे साखर उद्योगासमोरील मोठे आव्हान आहे. ऊस प्रक्रियेनंतर निर्माण होणाऱ्या उपपदार्थांमधून ऊर्जा, इंधन आणि इतर औद्योगिक उत्पादने तयार करून उद्योग अधिक सक्षम करता येऊ शकतो. इथेनॉलसारख्या उत्पादनांमुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होत असून चक्रीय अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासाच्या संकल्पना स्वीकारणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेच्या प्रारंभी स्कूल ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स अँड बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे संचालक डॉ. ए. एम. गुरव यांनी उद्दिष्टांची माहिती दिली, तर स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी स्वागत केले. संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि उपपदार्थांचे मूल्यवर्धन यांच्या माध्यमातून साखर उद्योगासमोरील आव्हानांवर मात करता येईल, असे त्यांनी नमूद केले.
कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी साखर कारखान्यांचे शिक्षण, सामाजिक विकास आणि ग्रामीण प्रगतीतील योगदान अधोरेखित केले. कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी विद्यार्थ्यांनी उद्योगाभिमुख संशोधन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात आयोजित परिसंवादात जयदीप पाटील, जयकुमार पाटील, एस. बी. चरापले, संजय शेटे, विशाल भास्कर आणि अभिजित पाटील यांनी साखर उद्योगातील नव्या संधी, तंत्रज्ञान, इथेनॉल उत्पादन आणि शाश्वत विकासाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेला प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, शेतकरी, साखर उद्योगातील अधिकारी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजनासाठी अभिजित पाटील आणि सागर जानराव यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. रेणुका तुरुंबेकर यांनी केले, तर डॉ. आसावरी यादव यांनी आभार मानले,
Sugar Industry Sustainability
|