मनोरंजन

‘ऑपरेशन तिरंगा’साठी अटारी-वाघा बॉर्डरवर पोहोचली ‘तारिणी’; शिवानी सोनार म्हणाली, “हा अनुभव आयुष्यभर विसरणार नाही”

tarini serial operation tiranga atari wagah border shivani sonar


By Shivani - 8/24/2026 3:39:51 PM
Share This News:



ऑपरेशन तिरंगा’साठी अटारी-वाघा बॉर्डरवर पोहोचली ‘तारिणी’; शिवानी सोनार म्हणाली, “हा अनुभव आयुष्यभर विसरणार नाही”

Marathi Serial Update News - 

‘झी मराठी’ वरील लोकप्रिय मालिका ‘तारिणी’ सध्या दमदार आणि देशाच्या सुरक्षेशी संबंधित कथानकामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत तारिणी एका महत्त्वाच्या गुप्त मोहिमेवर असून, ‘ऑपरेशन तिरंगा’ साठी ती अमृतसरला पोहोचली आहे. विशेष म्हणजे या कथानकाच्या निमित्ताने मालिकेचे शूटिंग भारत-पाकिस्तान सीमेवरील अटारी-वाघा बॉर्डरवर करण्यात आले आहे.

तारिणीसमोर आता देशाच्या सुरक्षेशी संबंधित मोठे आव्हान उभे राहिले आहे. एका गूढ संदेशापासून तिच्या नव्या मिशनची सुरुवात होते. अमृतसरमध्ये पोहोचल्यानंतर तिचा संपर्क बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी येतो. भारताविरोधात मोठा कट रचला जात असल्याची माहिती तिला मिळते. या कटामध्ये शत्रू देशातील काही महिलांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जातो.

‘सलमा’ बनून तारिणी करणार गुप्त तपास

या कटाचा छडा लावण्यासाठी तारिणीला स्वतःची खरी ओळख लपवावी लागणार आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे ती संशयित सलमापर्यंत पोहोचते. मात्र, या प्रकरणातील महत्त्वाचे रहस्य समोर आल्यानंतर मिशन आणखी धोकादायक बनते.

देशाच्या सुरक्षेसाठी तारिणीला आपली ओळख बाजूला ठेवून ‘सलमा’ ही नवी ओळख स्वीकारावी लागणार आहे. या मिशनमध्ये प्रत्येक पाऊल धोक्याने भरलेले असून, कोणत्याही क्षणी तिची खरी ओळख उघड होण्याची शक्यता आहे.

अटारी-वाघा बॉर्डरवरील शूटिंगचा शिवानी सोनारचा अनुभव

तारिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शिवानी सोनारने अटारी-वाघा बॉर्डरवरील शूटिंगचा अनुभव शेअर केला. “तारिणीने मला आजवर खूप काही दिलं आहे आणि अटारी-वाघा बॉर्डरवर शूट करण्याचा हा अनुभव मी आयुष्यभर विसरणार नाही,” असे शिवानीने सांगितले.

शूटिंगदरम्यान तिची भेट कल्याणी नावाच्या एका तरुण बीएसएफ अधिकाऱ्याशी झाली. कल्याणीला ‘तारिणी’ मालिका आणि शिवानीची भूमिका आवडत असल्याचे समजल्यावर हा क्षण आपल्यासाठी भावनिक ठरल्याचे शिवानीने सांगितले.

“आपल्या कामातून देशासाठी काहीतरी योगदान देऊ शकतो, अशी इच्छा माझ्या मनात नेहमीच होती. पण माझ्या कामामुळे ते शक्य होईल का, याची मला कल्पना नव्हती. ‘तारिणी’मुळे मला ही संधी मिळाली, यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे,” असे शिवानी म्हणाली.

‘तारिणी’च्या संपूर्ण टीमचे शिवानीकडून आभार

ही भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल शिवानीने देवाचे आणि मालिकेच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. ‘झी मराठी’, एरिकॉन टीम, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, भीमराव मुडे, पीयूष, लेखक आणि विशेषतः प्रल्हाद कुडतरकर यांचे तिने आभार व्यक्त केले.

“त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि तारिणीची ही भूमिका मला साकारण्याची संधी दिली. भारत-पाकिस्तान सीमा असलेल्या अटारी-वाघा बॉर्डरवरचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी कायमच खास राहील,” असे शिवानीने म्हटले.

‘ऑपरेशन तिरंगा’ मध्ये पुढे काय होणार?

‘ऑपरेशन तिरंगा’च्या माध्यमातून देशाला सुरक्षित ठेवण्याची मोठी जबाबदारी आता तारिणीसमोर आहे. ‘सलमा’च्या रूपात काम करताना तारिणीची खरी ओळख गुप्त राहणार का? या धोकादायक मिशनमध्ये तिला कोणाची साथ मिळणार? भारताविरोधातील कटाचा तारिणी कसा पर्दाफाश करणार? या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत.


तारिणी ‘ऑपरेशन तिरंगा’साठी अटारी-वाघा बॉर्डरवर; शिवानी सोनारचा खास अनुभव
Total Views: 19