शैक्षणिक
वि. स. खांडेकरांचे साहित्य आजही प्रस्तुत; डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे प्रतिपादन
By Shivani - 2/9/2026 5:01:34 PM
Share This News:
बदलत्या सामाजिक परिस्थितीतही खांडेकरांचे साहित्य प्रस्तुत; डॉ. भालचंद्र मुणगेकर
कोल्हापूर :
मानवी जीवनातील नैतिक द्वंद्व, स्त्री-पुरुष संबंध, सामाजिक विषमता, शिक्षणाचे उद्दिष्ट आणि शोषणमुक्त समाजाची आकांक्षा यांचा वेध घेणारे वि. स. खांडेकर यांचे साहित्य आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीतही तितकेच प्रस्तुत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभाग आणि आंतरभारती शिक्षण मंडळ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वि. स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्षाच्या सांगता समारंभात ‘वि. स. खांडेकर : सुवर्ण स्मरण’ या विषयावर विशेष स्मृती व्याख्यान देताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव होत्या. आंतरभारती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुचेता कोरगावकर, माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे आणि खांडेकरांचे नातू डॉ. अतुल कापडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘ययाती’ची आजची प्रस्तुतता अधिक
वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ कादंबरीची आजची प्रस्तुतता १९६०च्या दशकापेक्षाही अधिक असल्याचे डॉ. मुणगेकर यांनी सांगितले. ‘क्रौंचवध’मधील दिनकर-सुलोचना यांच्या नात्यातून शारीरिक वासनेपलीकडील आंतरिक प्रेमाचे चित्रण, तर ‘ययाती’मधून पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्रीच्या शोषणाचे टोकदार वास्तव खांडेकरांनी मांडले, असे त्यांनी नमूद केले.
मानवी जीवनातील विविध टोकांमधील संघर्ष आणि त्याचा आलेख मांडणारा साहित्यिक म्हणून खांडेकरांचे महत्त्व अधोरेखित होते. उपभोगवाद, पुरुषप्रधान मानसिकता, मानवी वासना, प्रेम, त्याग, नैतिकता आणि हिंसेविषयीची भूमिका यांसारखे विषय त्यांच्या साहित्यातून आजच्या समाजाशी थेट संवाद साधतात, असेही मुणगेकर म्हणाले.
“खांडेकर केवळ अलंकारिक भाषेचे साहित्यिक नव्हते, तर मानवी जीवनाचे भाष्यकार होते.”
जीवनात निर्मळता, सुसंस्कृतपणा, ध्येयनिष्ठा आणि शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा, हे त्यांच्या साहित्यामागील मूलभूत स्वप्न होते. त्यामुळे त्यांच्या साहित्याची प्रासंगिकता काळाच्या पुढेही टिकून राहते, असे डॉ. मुणगेकर यांनी स्पष्ट केले.
‘क्रौंचवध’चा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव
‘क्रौंचवध’मधील दिनकरच्या व्यक्तिरेखेने आपल्यावर मोठा प्रभाव टाकला. विद्यार्थीदशेत या साहित्यकृतीने जीवन जगण्याची प्रेरणा दिली आणि आपल्या आयुष्याची वाटचालही त्याच मार्गाने व्हावी, अशी इच्छा निर्माण झाली, अशी भावना डॉ. मुणगेकर यांनी व्यक्त केली.
“गेल्या पन्नास वर्षांच्या माझ्या जीवनप्रवासात खांडेकरांचे ऋण अग्रस्थानी आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत ते माझ्यावर राहील,” अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.
तंत्रज्ञानाच्या युगातही खांडेकरांचे साहित्य दिशादर्शक
माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी खांडेकरांचे साहित्य एका पिढीपुरते मर्यादित नसल्याचे सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणूस अधिक सामर्थ्यवान झाला असला, तरी तो अधिक ‘माणूस’ झाला आहे का, हा प्रश्न विचारण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
खांडेकरांच्या साहित्याचा केंद्रबिंदू असलेली माणुसकी, नैतिकता, संवेदना, सामाजिक बांधिलकी आणि जीवनदृष्टी आजच्या पिढीसाठी दिशादर्शक ठरू शकते. विद्यार्थ्यांच्या हातात केवळ पदवी नव्हे, तर विचार; केवळ कौशल्य नव्हे, तर विवेक आणि रोजगारासाठीच नव्हे तर जीवनासाठी शिक्षण देणे, हीच खऱ्या अर्थाने खांडेकरांना आदरांजली ठरेल, असे साळुंखे यांनी सांगितले.
शिवाजी विद्यापीठाशी खांडेकरांचे अतूट नाते
ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी वि. स. खांडेकर यांचे शिवाजी विद्यापीठाशी स्थापनेपासूनच अतूट नाते असल्याचे सांगितले. विद्यापीठाच्या पहिल्या अधिसभेचे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून खांडेकरांनी प्रारंभीच्या काळात विद्यापीठाला मार्गदर्शन केले.
ज्ञानपीठ पुरस्कारानंतर खांडेकरांना मानद डी.लिट. पदवी देणारे महाराष्ट्रातील शिवाजी विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ ठरले. विद्यापीठाने साकारलेले वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय हे विद्यापीठाने खांडेकरांविषयी जपलेल्या आदराचे प्रतीक असल्याचे डॉ. लवटे यांनी सांगितले.
‘AI’च्या युगात प्रत्यक्ष साहित्यिक विचारांचे महत्त्व
प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही साहित्यिकांच्या प्रत्यक्ष विचारांतून आणि अनुभवांतून मिळणाऱ्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले.
आज माहिती आणि भाषणे काही क्षणांत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून उपलब्ध होत असली, तरी प्रत्यक्ष दिग्गज साहित्यिकांचे विचार ऐकताना मिळणारा भावनिक आणि मानवी स्पर्श कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय ठरू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
खांडेकरांच्या साहित्यात पुढील पिढ्यांनाही घडविण्याची क्षमता असल्याने विद्यार्थ्यांचा अशा साहित्यिकांच्या विचारांशी प्रत्यक्ष संवाद घडविणारे कार्यक्रम सातत्याने आयोजित करणे आवश्यक असल्याचे डॉ. जाधव यांनी नमूद केले.
खांडेकरांच्या साहित्यावरील ग्रंथांचे प्रकाशन
सांगता समारंभानिमित्त दिवसभर विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. पुणे येथील प्रा. मिलिंद जोशी आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वि. स. खांडेकर यांचे असंग्रहित लेखन व त्यांच्याविषयीचे ग्रंथ’ या विषयावर सत्र झाले. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते.
यावेळी वि. स. खांडेकर लिखित ‘वृंदावन’, ‘आगरकर चरित्र’, ‘स्मृतींची चाळता पाने’ आणि ‘अर्ध्यदान’ या ग्रंथांसह खांडेकरांवरील विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
यामध्ये ‘आंतरभारती : उगम आणि विकास’ – डॉ. सुनीलकुमार लवटे, ‘कुमारांसाठी वि. स. खांडेकर’ – नीलम माणगावे, ‘वि. स. खांडेकर : साहित्यिक आणि माणूस’ – राम देशपांडे, ‘वि. स. खांडेकर चरित्र’ – डॉ. लवटे आणि ‘वि. स. खांडेकर : एक ध्येयवादी शिक्षक’ – जया दडकर या पुस्तकांचा समावेश होता.
तसेच साप्ताहिक साधना, दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, जडण-घडण आणि मेहता ग्रंथजगत या नियतकालिकांच्या खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष विशेषांकांचेही प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमात सुचेता कोरगावकर आणि डॉ. अतुल कापडी यांनी खांडेकरांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला डॉ. शरद नावरे, बी. एस. पाटील, डॉ. बी. एम. हिर्डेकर, डॉ. प्रवीण चौगुले, डॉ. अनिल गवळी, चंद्रकांत पोतदार, तनुजा शिपूरकर, डॉ. आर. जी. कुलकर्णी, डॉ. सागर देशपांडे यांच्यासह शिक्षक, आंतरभारती संस्थेतील शिक्षक व सेवक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वि. स. खांडेकरांचे साहित्य आजच्या काळातही महत्त्वाचे; डॉ. भालचंद्र मुणगेकर
|