शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागात ‘मोडी लिपी प्रशिक्षण’ कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
By Administrator - 11/1/2026 11:33:29 AM
Share This News:
शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाच्या वतीने दि. ५ जानेवारी २०२६ ते ९ जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियानाच्या अंतर्गत (PM-USHA) ‘ मोडी लिपी प्रशिक्षण’ ही कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली. ही कार्यशाळा एकूण पाच दिवस व ३० तास अशा स्वरुपाची होती.
या कार्यशाळेस प्रथम दिवशी साधन व्यक्ती म्हणून विश्वासराव नाईक महाविद्यालय शिराळाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. तानाजी हवालदार यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी ‘मराठा कालखंड आणि मोडी कागदपत्रे' यांच्या सहसंबंधाविषयी विशेष मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील मोडी तज्ज्ञ श्री. मच्छिंद्र चौधरी यांनी ‘मोडीची ओळख व त्याचे प्रत्यक्ष उपयोजन आणि मोडी कागदपत्राचे प्रकार’ या विषयावर मार्गदर्शन केले.
तिसऱ्या दिवशी साधन व्यक्ती म्हणून मोडी तज्ज्ञ श्री. पांडुरंग आंबले यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी ‘मोडी कालगणना व मराठेकालीन कालगणनेचे संशोधकीय उपयोजन’ या विषयावर उजळणी वर्ग तथा मार्गदर्शन केले. चौथ्या दिवशी महावीर महाविद्यालय कोल्हापूर येथील इतिहास विभागाचे सहाय्यक प्राध्यापक तथा मोडी तज्ज्ञ श्री. चंद्रशेखर काटे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी ‘मोडी दस्तावेजांची लेखा शैली व गणितीय उजळणी’ या विषयावर मार्गदर्शन केले. पाचव्या दिवशी श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर येथील सहाय्यक प्राध्यापिका व मोडी तज्ज्ञ डॉ. पूनम भूयेकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी ‘प्रत्यक्ष मोडीचे उपयोजन तथा उजळणी वर्ग’ घेतला.
या कार्यशाळेचा सांगता समारंभ छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्राच्या समन्वयक डॉ. निलांबरी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. दत्तात्रय मचाले व डॉ. पुनम भूयेकर यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यशाळेसाठी इतिहास अधिविभागप्रमुख डॉ. अवनीश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या अभ्यासक्रमासाठी एकूण पंचावन्न विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी चाळीस विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. अनेक ज्येष्ठ नागरिकांनीही या कार्यशाळेस आपला सहभाग नोंदवून या कार्यशाळेचा लाभ घेतला. असा नाविन्यपूर्ण उपक्रम इतिहास विभागाने राबविल्याबद्दल त्यांनी विभागाचे आभार मानत पुढील काळातही अशा उपक्रमांमध्ये आम्हाला सहभागी होण्यास आनंदच होईल, अशा प्रतिक्रिया नोंदविल्या. एकूणच सर्वांच्या सहकार्याने ही कार्यशाळा यशस्वी झाली.
|