आजऱ्यात ऐन संक्रांतीला एका गरीब कुटुंबावर काळाचा घाला
By Administrator - 1/15/2026 10:47:55 AM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- अठरा विश्व दारिद्र्य घेऊन या महागाईच्या काळात मिळेल त्या जागेवर आपल्या राहुट्या बांधून राहणारे आणि लोहार काम करून आपल्या पोटाची खळगी भरत आपल्या पोटच्या गोळ्यांचा सांभाळ करीत आयुष्य कंठणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील पोवार कुटुंबियांच्यावर ऐन संक्रांतीच्या सणाला काळाचा घाला पडला. आजऱ्याच्या राईसमिलजवळ नमाजगा माळावर ठेवलेल्या लाकडी ओंडक्यांच्या ढिगाऱ्यामधील एक ओंडका अंगावर पडून अकरा वर्षीय आदर्श किरण पोवार सद्या राहणार राईस मिलजवळ तर मूळ गाव येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव या शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला. ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या या दुःखदायक घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पोवार कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी लोहार कामाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी लोहार काम करीत आजऱ्यात आले आहेत. राईसमील जवळील मोकळ्या जागेत आपल्या झोपड्या (राहुट्या) मारून लोहार काम सुरु केले आहे. किरण पोवार हे एक महिन्यापूर्वी आजरा शहरात आले आहेत. बुधवारी सकाळी पोवार कुटुंबीय कामात मग्न असताना त्यांचा अकरा वर्षीय शाळकरी मुलगा आदर्श हा नमाजगा माळावर मोकळ्या जागेत ओंडक्यांच्या ढिगाऱ्यावर पतंग उडवत होता. ढिगाऱ्यावरून पतंग उडवीत असताना ओंडके सरकून त्याच्या अंगावर ढिगाऱ्यातील लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्शचा जागीच मृत्यू झाला.
आदर्श हा अत्यंत हुशार विद्यार्थी चौथीच्या वर्गात शिकत होता.काबाड कष्ट करून मुलाला चांगले शिक्षण देऊन उतरत्या वयाचा आधार शोधत जगणाऱ्या त्याच्या आई वडलांनी फोडलेला हंबरडा उपस्थित लोकांच्या अक्षरशः काळजाला जाऊन भिडत होता. आईचे रडून रडून हाल झाले होते. यावेळी आजऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते सईदभाई मुल्ला जे कोणत्याही अपघाताच्यावेळी सक्रिय असतात ते त्यांच्या कुटुंबियांकडे जाऊन सांत्वण करीत कोणतीही मदत लागल्यास हाक मारा मी येथे जवळच आहे असे सांगून धीर देण्याचा प्रयत्न केला. कुटुंबाचा आक्रोश अंगावर काटा निर्माण करीत होता.यावेळी मंजूर मुजावर, जुबेर माणगावकर,अबू माणगांवकर, अनपाल तकीलदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही आर्थिक मदत गोळा करून या गरीब कुटुंबाला आर्थिक मदत करणार असलेचे सांगितले.
|