बातम्या

महावितरणच्या आवाहनानंतर १३०० कृषिपंप ग्राहकांनी बसवले कपॅसिटर

1 300 agricultural pump consumers installed capacitors following


By nisha patil - 6/10/2026 7:32:10 PM
Share This News:



महावितरणच्या आवाहनानंतर १३०० कृषिपंप ग्राहकांनी बसवले कपॅसिटर

अखंड वीज पुरवठ्यासाठी कृषी ग्राहकांनी कपॅसिटर बसवावे – महावितरण

कोल्हापूर, दि.०६ ऑक्टोबर २०२६ : जिल्ह्यात शेती पंपांचा वापर वाढला असून बहुतांश शेतकऱ्यांनी लावलेल्या अॅटोस्वीचमुळे सर्व पंप एकाच वेळी सुरु होतात. पर्यायाने रोहित्रावर ताण येत असून ते नादुरुस्त होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे महावितरण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कपॅसिटर बसवण्याचे आवाहन करत आहे. जिल्ह्यात गेली दोन महिन्यात असे सुमारे १३०० हून अधिक शेतकऱ्यांनी महावितरणच्या प्रबोधनानंतर स्वेच्छेने कपॅसिटर बसवले आहेत. यामुळे त्या-त्या भागातील रोहित्र खराब होण्याचे प्रमाण नगण्य झाले असून शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा मिळत आहे.  

सध्या जिल्ह्यात पाऊसाने मोठी उघडीप दिल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी विहीर, बोरवेलच्या पाण्याचा वापर करत आहेत. महावितरणकडे शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याकरिता मुबलक वीज उपलब्ध आहे. मात्र शेतकऱ्यांनी लावलेल्या अॅटोस्वीचमुळे सर्व पंप एकाच वेळी सुरु झाल्यास रोहित्रावर ताण येऊन रोहित्र जळणे,  फ्युज खराब होणे व पर्यायाने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे शेतकऱ्याला वीज उपलब्ध असूनही पंप सुरू करणे शक्य होत नाही. तसेच मानवी हस्तक्षेपाशिवाय म्हणजेच अॅटोस्वीचद्वारे कृषीपंपाचा वीजपुरवठा सुरू झाल्यास पंपाच्या मोटारीचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.

यामुळेच महावितरण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषीपंपांच्या कपॅसिटर बसविण्याचे आवाहन करत आहे. सध्या सुरु असणाऱ्या सेवा सेतू कॅम्प मध्येही शेतकऱ्यांना याबाबत माहिती देण्यात येत आहे. कपॅसिटर हा मोटारीच्या रिअॅक्टिव्ह पॉवरची भरपाई करून पॉवर फॅक्टर सुधारण्यास मदत करतो. त्यामुळे पंपास योग्य कॅपॅसिटर वापरणे महत्वाचे आहे. कपॅसिटरची क्षमता प्रत्येक पंपाच्या क्षमतेनुसार बदलते. शेतकऱ्यांनी मोटारीची क्षमता, व्होल्टेज, मोटारीचा प्रकार आणि विद्यमान पॉवर फॅक्टर तपासून अधिकृत व प्रमाणित इलेक्ट्रिशियनकडून कपॅसिटरची क्षमता निश्चित करावी.

योग्य क्षमतेचे कपॅसिटर बसवल्यास शेतकऱ्यांना लाभ – विक्रांत पाटील-किणीकर

महावितरणने सांगितल्यानुसार ऑईलफिल्ड कॅपॅसिटर बसवल्यानंतर व्होटेजमध्ये चांगली सुधारणा झाली आहे तसेच रोहित्र जाळण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे. कपॅसिटर बसवण्याचा लाभ शेतकऱ्यांना होत असल्याने सर्व शेतकऱ्यांनी योग्य क्षमतेचे कपॅसिटर बसवावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ईरीगेशन फेडरेशनचे सचिव विक्रांत पाटील-किणीकर यांनी केले आहे.

कपॅसिटरमुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होते -  गणपत लटपटे

महावितरण जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांना दिवसा वीज देत आहे. शेतकऱ्यांनी योग्य क्षमतेचा कपॅसिटर लावल्यास यंत्रणेवरील ताण कमी होऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी योग्य क्षमतेचे कपॅसिटर बसवून सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी केले आहे. 


महावितरणच्या आवाहनानंतर १३०० कृषिपंप ग्राहकांनी बसवले कपॅसिटर
Total Views: 9