ताज्या बातम्या

कोल्हापुरात अनधिकृत नळ कनेक्शनवर 25 हजारांचा दंड; फौजदारी कारवाईचा इशारा

kolhapur municipal corporation water tax illegal connection fine


By Shivani - 12/9/2026 2:09:27 PM
Share This News:



कोल्हापुरात अनधिकृत नळ कनेक्शनवर 25 हजारांचा दंड; फौजदारी कारवाईचा इशारा

कोल्हापूर :

कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत नळ कनेक्शन आणि पाणीपट्टी थकबाकीदारांविरोधात महापालिका प्रशासनाने कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. अनधिकृत नळ कनेक्शन नियमित करण्यासाठी नागरिकांना 12 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत संधी देण्यात आली आहे. या मुदतीत कनेक्शन अधिकृत करून न घेतल्यास संबंधितांवर 25 हजार रुपयांचा दंड तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार पाणीपट्टी वसुली आणि अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई करण्यासाठी चार उपद्रव शोध पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांच्या कामकाजाचा आढावा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी 10 सप्टेंबर रोजी घेतला.

पाणीपट्टी थकबाकीदारांचे कनेक्शन तोडणार

शहर आणि उपनगरातील ज्या नागरिकांकडे पाणीपट्टीची थकबाकी आहे, अशा थकबाकीदारांविरोधात वसुली पथकांमार्फत कारवाई करण्यात येणार आहे. थकबाकी न भरल्यास संबंधितांचे नळ कनेक्शन खंडित करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. भारूड यांनी दिले आहेत.

मोटर लावून पाणी उपसल्यास कारवाई

अनधिकृत नळ कनेक्शनसोबतच नळाला थेट मोटर लावून पाणी वापरणे किंवा चोरीच्या मार्गाने पाणी घेणे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जल अभियंता, शाखा अभियंता, पाणीपट्टी अधीक्षक आणि मीटर रिडर्स यांना याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

अनधिकृत कनेक्शन जोडणाऱ्या प्लंबरवरही कारवाई

महापालिकेची मंजुरी न घेता अधिकृत प्लंबरने अनधिकृत नळ कनेक्शन जोडून दिल्याचे आढळल्यास संबंधित प्लंबरचा नळ कारागीर परवाना रद्द करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

15 ऑक्टोबरपर्यंत कनेक्शन नियमित करण्याची संधी

अनधिकृत नळ कनेक्शन असलेल्या नागरिकांना ते नियमित करण्यासाठी 12 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अर्ज करता येणार आहे. यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला अनधिकृत नळ कनेक्शनचा फॉर्म भरून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.

महापालिका प्रशासनाने नागरिकांना आपल्या नळ कनेक्शनची स्थिती तपासून घेण्याचे आवाहन केले आहे. अनधिकृत कनेक्शन असल्यास दिलेल्या मुदतीत ते अधिकृत करून घ्यावे आणि पाणीपट्टीची थकबाकी तात्काळ भरावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.


Kolhapur Water Tax: अनधिकृत नळ कनेक्शनवर 25 हजारांचा दंड
Total Views: 8