बातम्या
कोल्हापुरात शिवतेज गणेशाला १ किलो सोन्याचा हार
By nisha patil - 8/25/2025 12:06:18 PM
Share This News:
कोल्हापुरात शिवतेज गणेशाला १ किलो सोन्याचा हार!
कोल्हापूरातील गणेशोत्सव यंदा एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरणार आहे. शाहूपुरी तिसरी गल्ली येथील शिवतेज मित्र मंडळाने आपल्या गणेश मूर्तीस तब्बल १ किलो सोन्याचा हार अर्पण करण्याचा संकल्प केला आहे.
मंडळाचे अध्यक्ष मोहित खोत म्हणाले, “मनोकामना पूर्ण झाल्यानंतर भाविकभावनेतून हा सुवर्णहार अर्पण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. नवसाला पावणारे शिवतेज गणेश भाविकांना प्रसन्नता, यश व समाधान देतात, हीच श्रद्धा या उपक्रमामागे आहे.”
शिवतेज मित्र मंडळाची मूर्ती गेल्या अनेक वर्षांपासून ‘प्रसन्नतेचे प्रतीक’ मानली जाते. साधी पण आकर्षक सजावट, उत्सव व्यवस्थापन आणि भक्तिभाव यामुळे मंडळाने भाविकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. शहराबरोबरच बाहेरगावच्या भाविकांचीही श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते.
या वर्षीचा सुवर्णहार अर्पण सोहळा हा केवळ सजावटीचा भाग नसून भाविकांच्या सामूहिक श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक ठरणार आहे. भाविकांच्या नवसातून जमा झालेली भक्तीशक्ती या सुवर्णहाराच्या रूपाने साकार होत आहे.
सध्या या ऐतिहासिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, हजारो भाविकांच्या उपस्थितीत मान्यवर आणि मंडळाचे पदाधिकारी यांच्या हस्ते सुवर्णहार अर्पण केला जाणार आहे. मंडळ परिसरात विशेष सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भक्तिसोहळ्यांची आखणी करण्यात आली आहे.
मंडळाच्या वतीने सांगण्यात आले की, “श्रींच्या कृपेने प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण व्हावी हीच आमची प्रार्थना आहे. हा सुवर्णहार अर्पण सोहळा गणेशभक्ती आणि सामूहिक एकतेचा साक्षीदार ठरणार आहे.”
🙏 गणपती बाप्पा मोरया!
कोल्हापुरात शिवतेज गणेशाला १ किलो सोन्याचा हार!
|