सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कामगारांना १० टक्के पगारवाढ
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत निर्णय; कामगार युनियनच्यावतीने सत्कार
कागल | दि. ३ नोव्हेंबर २०२५ सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कामगारांसाठी आनंदाची बातमी — कारखाना प्रशासनाने कामगारांना दहा टक्के पगारवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शासन प्रतिनिधी, राज्य कामगार प्रतिनिधी आणि कारखाना व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्या त्रिपक्षीय करारानुसार १ नोव्हेंबर २०२५ पासून ही वाढ अंमलात आली आहे.
या निर्णयामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण असून, कामगार युनियनच्यावतीने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विशेष सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले.
या बैठकीत कामगार युनियनचे पदाधिकारी, जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे, फायनान्स मॅनेजर संभाजी अस्वले आणि कामगार कल्याण अधिकारी संतोष मस्ती यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
युनियनचे अध्यक्ष मोहन पाटील यांनी सांगितले की, “मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या प्रेरणेने आणि अध्यक्ष नवीदसाहेब मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची प्रगतीशील वाटचाल सुरू आहे. त्रिपक्षीय करारानुसार लागू झालेली ही पगारवाढ म्हणजे कामगारांच्या हितासाठी घेतलेले महत्त्वाचे पाऊल आहे. आम्ही संपूर्ण कर्मचारीवर्ग कारखाना व्यवस्थापनाचे आणि मंत्री महोदयांचे ऋणी आहोत.”
या प्रसंगी युनियनचे उपाध्यक्ष काशिनाथ घोडके, रघुनाथ पाटील, सहखजिनदार धोंडीराम पाटील, सहचिटणीस संजय पाटील, विजय गुरव, प्रकाश पदमले, सुभाष बोडके, सचिन गुरव, बाळासो पाटील, सुनील देसाई, अमृत पाटील, सुनील दिवटणकर, संदीप अरळगुंडकर, सागर प्रधाने, संतोष पोवार आदींसह अनेक पदाधिकारी आणि कामगार उपस्थित होते.