बातम्या

जागते रहो.. मंत्र जपत ओंकारचे यश*

10 result omkar


By nisha patil - 8/5/2026 7:36:08 PM
Share This News:



*जागते रहो.. मंत्र जपत ओंकारचे यश*

कोल्हापूर : ओंकार पवन कांबळे हा कोरगावकर हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकतो . वडील पवन कांबळे कदमवाडी येथील शिवराज सोसायटीच्या सुहास राजेभोसले यांच्या बंगल्यावरती सुरक्षारक्षक म्हणून काम पाहतात .कर्नाटकातून ओंकार नववीमध्ये कोरगांवकर हायस्कूलला आला .

भाषेच्या अडचणीवर मात करीत त्याने आपल्या कुशाग्रबुद्धीच्या बळावर हे यश संपादन केले . ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी स्लॅबच्या कामासाठी वडीलांचे जाणे होत असे .

अशा वेळी सुरक्षारक्षक म्हणून ओंकार आवडीने काम करीत असे .बंगल्याच्या पिछाडीला दोन खोल्यांचे घर राजेभोसले यांनी पवन कांबळे यांना राहण्यासाठी दिले आहे . वडील स्लॅबच्या कामावर गेले की ओंकार सुरक्षारक्षक म्हणून तत्परतेने आठवड्यातून किमान तीनदा पहार्‍यावर असे . या जागलेपणाचा त्याला अभ्यासासाठी खूप फायदा झाला . संकट संधी म्हणून मनावर घेतले की यश मिळतेच असे ओंकारचे आणि त्याला शिक्षणासाठी दत्तक घेणाऱ्या नोकरी संदर्भच्या सुहास राजेभोसले यांचे ठाम मत आहे. ओंकार प्रामाणिकपणाने अभ्यास आणि काम याचा मेळ सांधतो .

त्याचा प्रामाणिकपणा पाहून आणि कष्ट घेण्याची वृत्ती पाहून सुहास राजेभोसले सरांनी त्याला शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे . ओंकारला इयत्ता दहावी मध्ये शेकडा ७२ . २० इतके गुण मिळाले . ओंकारची आई घरकाम करते आणि वडील स्लॅब टाकण्याचे तसेच सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात . कष्टाचे काम करून ओंकारला फक्त पाच तासाचा अभ्यासाला वेळ मिळत असे . त्यातून सुहास राजे भोसले यांच्याकडे येणारी सगळी वर्तमानपत्रे तो चाळत असे . यातून त्याचे सामान्यज्ञान देखील खूपच वाढले आहे .

भविष्यात वाणिज्य शाखा घेऊन त्याला सीए . व्हायचे आहे त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकार पदाची स्वप्नही तो पाहतोय . ओंकारला काम करून शाळेत हजर राहण्याची परवानगी कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे पर्यवेक्षिका सुरेखा पवार आणि वर्गशिक्षक सुभाष बेलवळेकर यांनी दिली .

शाळा सुटल्या नंतर व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी प्रत्येक शिक्षकांनी ओंकारला मदत केली आहे .ओंकारच्या यशाला आणि त्याच्या स्वप्नांना समाजाचे पाठबळ मिळणे गरजेचे आहे .


जागते रहो.. मंत्र जपत ओंकारचे यश*
Total Views: 10