बातम्या
*गडहिंग्लज विभागात १ लाख ५५ हजार १८९ स्मार्ट मीटर बसवून १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण
By nisha patil - 10/14/2026 6:01:35 PM
Share This News:
*गडहिंग्लज विभागात १ लाख ५५ हजार १८९ स्मार्ट मीटर बसवून १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण
*ग्राहकांनी महावितरणवर दाखविलेल्या विश्वासाचे यश; संपूर्ण श्रेय ग्राहकांना समर्पित-एस. के. पोवार
*आजरा(हसन तकीलदार)*:-महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण)च्या गडहिंग्लज विभागाने एकूण १ लाख ५५ हजार १८९ ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवून १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. ग्राहकांनी महावितरणवर दाखविलेला विश्वास, दिलेले सहकार्य आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे ही कामगिरी साध्य झाली आहे. या उल्लेखनीय यशाचे संपूर्ण श्रेय महावितरणने विभागातील सर्व वीज ग्राहकांना समर्पित केले आहे.असे गडहिंग्लज विभागचे कार्यकारी अभियंता संजय पोवार यांनी सांगितले.
गडहिंग्लज विभागात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेची सुरुवात २७ ऑगस्ट २०२४ रोजी गडहिंग्लज येथे पहिला स्मार्ट मीटर बसवून करण्यात आली. त्यानंतर आजरा, चंदगड, गडहिंग्लज आणि नेसरी या चारही उपविभागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविण्यात आली. अखेर १३ ऑक्टोबर २०२६ रोजी गडहिंग्लज येथे शेवटचा स्मार्ट मीटर बसविण्यात आला आणि विभागाने १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले.
उपविभागनिहाय स्मार्ट मीटर बसविलेल्या ग्राहकांची संख्या
उपविभाग स्मार्ट मीटर बसविलेले ग्राहक आजरा -३७,१६९,चंदगड ४८,३८६,गडहिंग्लज ४२,३४०,
नेसरी २७,२९४
एकूण गडहिंग्लज विभाग १,५५,१८९
उपविभागनिहाय कामगिरीमध्ये चंदगड उपविभागाने ४८,३८६ स्मार्ट मीटर बसवून सर्वाधिक योगदान दिले. गडहिंग्लज उपविभागात ४२,३४०, आजरा उपविभागात ३७,१६९, तर नेसरी उपविभागात २७,२९४ स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.
स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेच्या सुरुवातीला अनेक ग्राहकांच्या तसेच लोकप्रतिनिधींच्या मनात स्मार्ट मीटरविषयी विविध गैरसमज व शंका होत्या. हे गैरसमज दूर करून ग्राहकांचा विश्वास संपादन करणे हे महावितरणच्या गडहिंग्लज विभागासमोरील महत्त्वाचे आणि मोठे आव्हान होते. या पार्श्वभूमीवर विभागाने ग्राहकांशी थेट संवाद साधण्यावर विशेष भर दिला.
गडहिंग्लज विभागातील विविध गावांमध्ये ग्राहक मेळावे आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आयोजित ग्रामसभांमध्ये महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले. या वेळी स्मार्ट मीटरविषयी नागरिकांच्या मनातील शंका व गैरसमज दूर करून त्यांना स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, फायदे आणि वीज वापरासंदर्भातील माहिती समजावून सांगण्यात आली.
या सातत्यपूर्ण जनजागृतीमुळे ग्राहक व लोकप्रतिनिधींच्या मनातील शंका दूर होण्यास मदत झाली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावागावांत जाऊन साधलेल्या संवादामुळे ग्राहकांचा विश्वास संपादन करता आला. ग्राहकांनी महावितरणवर विश्वास ठेवून स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला दिलेले सहकार्य हेच या यशाचे खरे बळ ठरले. ग्राहकांच्या विश्वासामुळेच १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य झाले. त्यामुळे या कामगिरीचे संपूर्ण श्रेय महावितरणने आपल्या सर्व ग्राहकांना समर्पित केले आहे.
स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची माहिती अधिक सुलभतेने उपलब्ध होणे, मीटर रीडिंग प्रक्रियेत पारदर्शकता वाढणे आणि वीज वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे शक्य होत आहे. विशेषतः स्मार्ट टाइम ऑफ डे (TOD) मीटरमुळे ग्राहकांना दिवसा केलेल्या वीज वापराची माहिती मिळते. त्यामुळे दिवसा वीज वापरासाठी लागू असलेल्या सवलतीचा लाभ घेणे ग्राहकांना अधिक सोयीचे होते.
महावितरणच्या लागू असलेल्या दररचनेनुसार, दिवसा सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरणाऱ्या पात्र ग्राहकांना प्रति युनिट सवलत देण्यात येते. ही सवलत पुढीलप्रमाणे आहे.
आर्थिक वर्ष दिवसा वीज वापरावरील सवलत
२०२५–२६ ₹०.८० प्रति युनिट
२०२६–२७ ₹०.८५ प्रति युनिट
२०२७–२८ ₹०.९० प्रति युनिट
स्मार्ट TOD मीटरमुळे दिवसा वापरलेल्या विजेची नोंद स्वतंत्रपणे उपलब्ध होत असल्याने ग्राहकांना आपल्या वीज वापराचे नियोजन करता येते आणि लागू असलेल्या नियमांनुसार सवलतीचा लाभ मिळू शकतो.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, कार्यकारी अभियंता संजय कृष्णा पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंते अतुल भरमू पाटील (आजरा), अजित भीमराव पोवार (चंदगड), बिरुदेव मेटकर (नेसरी) आणि राम रघुनाथ सूर्यवंशी (गडहिंग्लज) यांच्यासह विभागातील अभियंते, अधिकारी, कर्मचारी आणि स्मार्ट मीटर बसविणाऱ्या संबंधित यंत्रणेने (AMISP) समन्वयाने प्रयत्न केले.
२७ ऑगस्ट २०२४ रोजी सुरू झालेल्या या मोहिमेचा १३ ऑक्टोबर २०२६ रोजी यशस्वी समारोप झाला. महावितरणचे नियोजन, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, गावागावांत राबविलेली जनजागृती आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांनी महावितरणवर दाखविलेला विश्वास यांमुळे गडहिंग्लज विभागाने स्मार्ट मीटर बसविण्याचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य केले. ग्राहकांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत या उल्लेखनीय कामगिरीचे संपूर्ण श्रेय महावितरणने ग्राहकांना समर्पित केले आहे.
*गडहिंग्लज विभागात १ लाख ५५ हजार १८९ स्मार्ट मीटर बसवून १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण
|