बातम्या
अमृत जल योजनेची कामे व देयकांबाबत १३ नगरसेवक आक्रमक
By nisha patil - 9/10/2026 7:45:16 PM
Share This News:
अमृत जल योजनेची कामे व देयकांबाबत १३ नगरसेवक आक्रमक
पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत उर्वरित देयके रोखण्याची मागणी
*आजरा(हसन तकीलदार)-: आजरा शहरासाठी मंजूर झालेल्या सुमारे २७ कोटी रुपयांच्या अमृत जल योजनेचे काम जवळपास दोन वर्षे उलटूनही पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. त्यातच पाणी पुरवठा करणारी मोटारी नादुरुस्त होणे, जळाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होणे आणि नागरिकांना वारंवार पाणीटंचाईला सामोरे जावे लागणे, या पार्श्वभूमीवर आजरा नगरपंचायतीच्या १३ नगरसेवक व नगरसेविकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन ठेकेदाराच्या देयकांबाबत कठोर भूमिका घेतली आहे.सर्व नगरसेवकाबरोबर चर्चा करूनच उर्वरित बिल आदा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अमृत जल योजनेअंतर्गत नदीवरील पाणी उपसा केंद्रासाठी ५० एच.पी. क्षमतेच्या दोन मोटारी—एक मुख्य व एक स्टँडबाय—आवश्यक आहेत. तसेच संपूर्ण शहराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी केवळ ५० एच.पी. मोटार पुरेशी नसल्याने अतिरिक्त ३० एच.पी. मोटार स्टँडबाय स्वरूपात उपलब्ध ठेवण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सध्या मोटार नादुरुस्त होणे अथवा जळणे यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असून नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक क्षमतेच्या अतिरिक्त मोटारीची व्यवस्था करण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
या निवेदनातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमृत जल योजनेअंतर्गत झालेली कामे, त्यांची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि ठेकेदाराच्या देयकांबाबत सर्व विभागातील नगरसेवकांशी चर्चा केल्याशिवाय कोणतेही देयक अदा करू नये, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
योजनेची कामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यापूर्वी शहरातील सर्व भागांमध्ये नियमित, पुरेशा दाबाने आणि सुरळीत पाणीपुरवठा होत आहे किंवा नाही, याची नगरपंचायतीने प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करावी.
अमृत जल योजनेअंतर्गत शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत ठेकेदाराचे उर्वरित देयक अदा करू नये.
नदीवरील पाणी उपसा केंद्रावर आवश्यक क्षमतेच्या मोटारी उपलब्ध करून द्याव्यात तसेच ३० एच.पी. ची अतिरिक्त मोटार स्टँडबाय ठेवण्याबाबत ठेकेदारास सक्त सूचना द्याव्यात.
योजनेतील सर्व कामे पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत की नाहीत, याची तांत्रिक तपासणी करून घेण्यात यावी.
शहरातील सर्व भागांना नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरच ठेकेदाराच्या अंतिम देयकाबाबत निर्णय घेण्यात यावा.अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर अभिषेक शिंपी, परशूराम बामणे, मुसासर्फराज पटेल, आसिफ सोनेखान, निसार लाडजी, डॉ. सौ. स्मिता कुंभार, श्रीमती कलावती कांबळे, सौ. अश्विनी चव्हाण, सौ. आसावरी खेडेकर, सौ.रहिमतबी खेडेकर, सौ. निशात चॉंद,विक्रम पटेकर आणि डॉ. इंद्रजीत देसाई अशा एकूण १३ नगरसेवक व नगरसेविकांच्या सह्या आहेत.
“योजनेची कामे आणि देयके याबाबत सर्व नगरसेवकांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा,” अशी ठाम भूमिका या १३ नगरसेवकांनी घेतल्याने अमृत जल योजनेच्या कामकाजाकडे आता प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
अमृत जल योजनेची कामे व देयकांबाबत १३ नगरसेवक आक्रमक
|