विशेष बातम्या
महावितरणच्या ग्राहक मेळाव्यांना १४४० ग्राहकांचा प्रतिसाद; १२७७ तक्रारींचा जागेवर निपटारा
By nisha patil - 12/8/2025 2:56:01 PM
Share This News:
महावितरणच्या ग्राहक मेळाव्यांना १४४० ग्राहकांचा प्रतिसाद; १२७७ तक्रारींचा जागेवर निपटारा
कोल्हापूर, दि. ११ ऑगस्ट २०२५ – मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत जिल्ह्यातील शाखा कार्यालयांपर्यंत ग्राहक मेळावे आयोजित करण्यात आले. एकूण १९१ ठिकाणी पार पडलेल्या या मेळाव्यांना १४४० ग्राहकांनी भेट दिली. यापैकी १२७७ तक्रारींचा निपटारा जागेवरच करण्यात आला, तर उर्वरित १६८ तक्रारी विहित वेळेत सोडविण्याचे आदेश अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी दिले.
सार्वजनिक आरोग्य मंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार आणि कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या सूचनेनुसार या मेळाव्यांची व्याप्ती उपविभागीय पातळीवरून शाखा पातळीपर्यंत वाढविण्यात आली. तक्रारींचा तत्काळ निपटारा झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.
विभागनिहाय तक्रारी व निपटारा
-
कोल्हापूर शहर – १२ ठिकाणे, १३४ तक्रारींपैकी १२७ सोडविल्या
-
कोल्हापूर ग्रामीण 1 – ८७ ठिकाणे, ३११ पैकी २९१ सोडविल्या
-
कोल्हापूर ग्रामीण 2 – ३६ ठिकाणे, २६४ पैकी २०३ सोडविल्या
-
गडहिंग्लज – २० ठिकाणे, २६४ पैकी २२२ सोडविल्या
-
इचलकरंजी – ९ ठिकाणे, १६३ पैकी १५२ सोडविल्या
-
जयसिंगपूर – २७ ठिकाणे, ३०४ पैकी २८२ सोडविल्या
तक्रारींचा स्वरूप
ग्राहकांनी नोंदविलेल्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने नवीन वीज जोडणी, वाढीव वीज बिले, सौर कृषी पंप, कृषी पंपाचा भार कमी करणे, स्मार्ट टीओडी मीटर संदर्भातील अडचणी आणि विविध शंका यांचा समावेश होता. स्मार्ट टीओडी मीटर संदर्भातील सर्व तक्रारींचे प्रात्यक्षिकासह निराकरण करण्यात आले.
मेळाव्यात ग्राहकांना पीएम सूर्यघर योजना, कुसुम बी व मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना याबाबत माहिती देण्यात आली.
महावितरणच्या ग्राहक मेळाव्यांना १४४० ग्राहकांचा प्रतिसाद; १२७७ तक्रारींचा जागेवर निपटारा
|