बातम्या
मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्याप्रकरणी 15 जणांवर गुन्हा; राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण
By nisha patil - 4/1/2026 12:48:25 PM
Share This News:
सोलापूर:- सोलापूर महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या राजकीय वादातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका व प्रभाग क्रमांक 2 च्या उमेदवार शालन शिंदे, त्यांचे पती शंकर शिंदे यांच्यासह एकूण 15 जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. मनसेचे पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप आमदार विजय देशमुख व त्यांचे पुत्र किरण देशमुख या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच आमदारकी रद्द करावी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. हे आरोप असून त्याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
वादातून हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू
पोलीस तक्रारीनुसार, अपक्ष उमेदवार रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर शालन शिंदे यांच्या कुटुंबीयांकडून डिवचणारे स्टेट्स ठेवण्यात आले. यावरून शालन शिंदे व रेखा सरवदे यांच्या कुटुंबीयांत वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि भांडणादरम्यान बाळासाहेब सरवदे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
‘डोळ्यात चटणी टाकून वार’ — तक्रारीतील आरोप
मृत बाळासाहेब सरवदे यांचे भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे यांनी दिलेल्या फिर्यादीत, डोळ्यात चटणी टाकून धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप नमूद आहे. त्यावरून बीएनएस कलम 103, 109, 189(1),(2), 190, 191(2),(3), 49, 352, 351(2) तसेच शस्त्र अधिनियम 4, 25 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील कारवाई कायदेशीर प्रक्रियेनुसार केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्याप्रकरणी 15 जणांवर गुन्हा; राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण
|